मुंबई- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्कंठा शिगेला पोहोचली असतानाच महायुती आणि महाविकास आघाडीमधील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार म्हणून अनेक नेत्यांची नावं चर्चेत येत आहेत. तसेच त्यामधील एखाद्या नावावर मुख्यमंत्री म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्षातील महाविकास आघाडी दोन्हीकडच्या नेत्यांनी मतमोजणीनंतर आपल्या पक्षालाच जनादेश मिळेल, असा दावा केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल, असा दावा केला होता. त्याविरोधात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तसेस महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यानंतर मित्रपक्षाचे नेते एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदावर चर्चा करतील, असं संजय राऊत यांनी सांगितलं.जर काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांना ते मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असं सांगितलं असेल तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, वरिष्ठ नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी यांनी त्याची घोषणा केली पाहिजे, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी सांगितले की, ही विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवली गेली. तसेच मतदारांनी मतांच्या माध्यमातून एकनाश शिंदे यांना आपली पसंती दिली आहे. त्यामुळे पुढचे मुख्यमंत्री बनण्यावर एकनाथ शिंदे यांचा पूर्ण हक्क आहे. तसेच तेच पुढचे मुख्यमंत्री असतील, असा मला विश्वास आहे, असेही संजय शिरसाट म्हणाले.
तर भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव पुढे केलं. त्यांनी सांगितले की, भाजपामध्ये कुणी मुख्यमंत्री बनू शकत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. महाराष्ट्रातील जनता ही स्पष्ट जनादेश देण्याच्या दिशेने जात आहे. तसेच मुख्यमंत्री हा महायुतीचाच होईल, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार नाही.
तर अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्रिपदासाठी अजित पवार यांचं नाव पुढे केलं. त्यांनी सांगितलं की, निवडणुकीचा निकाल काहीही लागता तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा किंगमेकरच्या भूमिकेत राहील, असे सांगितले. तर देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील मित्रपक्ष एकत्र येऊन मुख्यमंत्रिपदाबाबत निर्णय घेतील, असे सांगितले.