स्वयंघोषित महाराज कालीचरण यांनी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित केलेल्या एका धार्मिक सभेत मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांनी मराठा आरक्षणाचा नेता असा उल्लेख केला होता. त्यांच्या वादग्रस्त टिप्पणीनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. मराठवाड्यातच सदर विधान केले केल्यामुळे येथील वातावरण तापले गेले आहे. यानंतर ज्यांच्या मतदारसंघात सदर कार्यक्रम झाला त्या संजय शिरसाट यांनी यावर भूमिका मांडली असून कालीचरण यांच्या टिप्पणीपासून हात झटकले आहेत.
टिकली लावली म्हणून कुणी संत होत नाही – जरांगे पाटील
दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनीही कालीचरण यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मी साधू-संताचा आदर करतो. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व मानतो. माझ्याबद्दल जे बरळत आहेत, त्यांना बरळू द्यावे. कारण ज्याने एका पक्षाचा ठेका घेतला आहे, अशांबद्दल आपण काही बोलले नाही पाहिजे. संत-महात्म्यांचा आदर करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. आम्ही ज्या हिंदू धर्मात आहोत, त्यातील सर्वात कट्टार वर्ग आहे मराठा समाज. पण हाच समाज आज अडचणीत आलेला आहे.
मराठा कट्टर हिंदू
“आम्ही आरक्षण मागतो, याचा अर्थ आम्ही जातीवाद करत नाहीत. आम्ही हिंदूच आहोत. पण गरीबांच्या मुलांना आरक्षण दिले जात नाही. वाकडी टिकली लावलेले स्वतःला धर्माचे रक्षक मानतात. पण धर्माची खरी रक्षक जनता आहे. जनता स्वतःच्या अंगावर वार सोसते. हे टिकली लावणारे संत फक्त सुपाऱ्या, नारळ, पैसे घेऊ शकतात. खरा हिंदू धर्म वारकरी, गरीब जनता चालवत आहे. हरळ खाऊन जगणारे लोक धर्माचे ठेकेदार नाहीत. मराठा कट्टार हिंदू आहे आणि राहणारच”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.