बारामती : गेल्या साठ वर्षांहून अधिक काळ शदर पवारांना साथ देणारी बारामतीची जनता प्रामाणिक व एकनिष्ठ आहे. या जनतेचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी चुकीच्या विचारांना, प्रवृत्तीला आणि वागणुकीला कधीच थारा दिलेला नाही. त्यामुळे यंदा लोकसभेच्या निर्णायक लढाईत सर्वसामान्य बारामतीकरांनी साथ दिली. त्यामुळे बारामती नेमकी कुणाची? हे अवघ्या देशाला माहीत झाले आहे. कारण, बारामतीच्या जनतेचे वेगळेपण फक्त शरद पवारांनाच समजते. म्हणून कुणी कितीही आदळआपट आणि दमदाटी केली, तरी अशा लोकांना मतपेटीतून जागेवर आणतील, असा विश्वास युगेंद्र पवार यांनी व्यक्त केला.
तालुक्यातील माळेगाव खुर्द येथील ग्रामस्थांशी ते बोलत होते. याप्रसंगी तालुक्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत, अशी ग्वाही उपस्थित ग्रामस्थांनी दिली. या प्रचार दौऱ्यात त्यांनी थोपटेवाडी, कुरणेवाडी, लाटे, माळवाडी, म्हसोबावाडी, मानाजीनगर, धुमाळवाडी, पवईमाळ सोनकसवाडी, पणदरे आणि पाहुणेवाडी येथे भेट देऊन स्थानिकांशी संवाद साधला. पुढे ते म्हणाले की, शहरात वरवरचा विकास दिसत असला तरी बेरोजगारी, पाणी प्रश्न, महिला सुरक्षा, वाहतूक व्यवस्था, पार्किंग आणि कायदा व सुव्यवस्था यासोबतच आपल्या भागातील पायाभूत सुविधांचा शाश्वत विकास होणे गरजेचे आहे. त्यामुळे नियोजनबद्ध आराखडा तयार करून दर्जेदार पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. त्यासाठी आपला साथ आणि सोबत कायम ठेवा. लोकसभा निवडणुकीप्रमाणे आताही आपण सगळे स्वाभिमानाची लढाई लढत आहोत. आपल्या तालुक्यातील जनता कायम सत्याशी पाठीशी उभी राहिली आहे.
पवार साहेबांच्या स्वप्नातील बारामती घडवायची आहे. त्यासाठी त्यांच्या स्वाभिमानी विचारांवर वाटचाल करण्यासाठी आणि सुप्रिया सुळेंच्या मार्गदर्शनाखाली आपल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी निवडणुकीत आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी.
आज होणाऱ्या सांगता सभेकडे सर्वांचे लक्ष...
शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती येथे युगेंद पवार यांच्या प्रचारार्थ सांगता सभा आज होत आहे. तसेच अजित पवार यांची सांगता सभादेखील सोमवारी दुपारी २ वाजता आयोजित केली आहे. या दोन्ही सभाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.