अहिल्यानगर : बनावट शस्त्र परवान्यांच्या नावाखाली अहिल्यानगर शहर व जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या जम्मू-काश्मिरच्या नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १२ बोअरच्या नऊ रायफली व ५८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिटरी इंटेलिजन्सच्या (पुणे) पथकाने ही कारवाई केली.
जम्मू व काश्मिर राज्यातील काही व्यक्ती बनावट कागदपत्रांच्या आधारे अहिल्यानगर शहर व आजूबाजूच्या शहरात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करीत आहेत, अशी माहिती तोफखाना पोलिस व दक्षिणी कमांड मिलिटरी इंटेलिजन्स यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने अहिल्यानगर, श्रीगोंदा, सोनई, पुणे अशा विविध ठिकाणी छापे टाकून नऊ आरोपींना ताब्यात घेतले. हे सर्व आरोपी जम्मू-काश्मिरच्या राजौरी जिल्ह्यातील आहेत.
त्यांच्याकडून १२ बोअरच्या नऊ रायफली, बनावट शस्त्र परवाने व ५८ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. आरोपींकडे असलेल्या शस्त्र परवान्यांची खात्री केली असता असे कोणतेही शस्त्र परवाने दिले नसल्याचे जम्मू-काश्मिरमधील राजौरीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे. त्यानुसार या आरोपींच्या विरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास तोफखान्याचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे करीत आहेत.५० हजारांत परवानाआरोपी शेर अहेमद गुलाम हसेन (रा. कलाकोटबन, राजौरी, जम्मू-काश्मिर, हल्ली रा. पुणे) हा या रॅकेटचा मुख्य सूत्रधार आहे. त्याने इतर आरोपींना सुरक्षारक्षक म्हणून नोकरीला लावून देण्यासाठी बनावट शस्त्र परवाना व १२ बोअर रायफली मिळवून दिल्या. त्यासाठी त्याने प्रत्येकी ५० हजार रुपये घेतले असल्याची कबुली आरोपींनी दिली.
अटक आरोपींची नावे
शब्बीर मोहंमद इक्बाल हुसैन गुज्जर (वय ३८), महंमद सलीम ऊर्फ सालेम गुल महंमद (वय ३२), जहांगीर झाकिर हुसैन (वय २८, हल्ली तिघे रा. नागापूर, अहिल्यानगर), महंमद सर्फराज नजीर हुसैन (वय २४, हल्ली रा. घोगरगाव, श्रीगोंदा), शाहबाज अहमद नजीर हुसैन (वय ३३, हल्ली रा. श्रीगोंदा), सुरजित रमेशचंद्र सिंग (हल्ली रा. सोनई, नेवासा), अब्दुल रशिद चिडीया (वय ३८, हल्ली रा. पुणे), तुफेल अहमद महंमद गाजीया (हल्ली रा. पुणे), शेर अहमद गुलाम हुसैन (हल्ली रा. पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
परवाना बनावट तरी नोकरी
अटक झालेले हे आरोपी अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, श्रीगोंदा, सोनई अशा विविध ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. त्यांच्याकडे असलेल्या रायफलींचे परवाने हे बनावट असल्याचे त्यांना माहिती होते. असे असताना देखील त्यांनी बनावट शस्त्र परवाने व १२ बोअर रायफलींच्या आधारावर नोकरी मिळवून शासनाची फसवणूक केली आहे.
तोफखाना पोलिस व मिलिटरी इंटेलिजन्सने मोठी कामगिरी केली आहे. अटक आरोपींची कसून चौकशी होईल. अहिल्यानगरसह आणखी कुठे बनावट शस्त्र परवाने आहेत का, याची चौकशी सुरू आहे. आरोपींनी या शस्त्रांचा काही गैरवापर केला का? हे देखील तपासले जाईल.
- राकेश ओला,पोलिस अधीक्षक