विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून प्रचारसभांचा धडाका सुरू आहे. तर दुसरीकडे मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे, दरम्यान, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही आपली भूमिका मांडली आहे.'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी', अशी स्पष्ट भूमिका लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केली आहे.
आज पत्रकार परिषद घेऊन लक्ष्मण हाके यांनी आपली भूमिका मांडली. लक्ष्मण हाके म्हणाले, या महाराष्ट्रातील ओबीसी, भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझी विनंती आहे की आपलं बहुमुल्य मत योग्य त्या माणसाला आणि योग्य पक्षाला द्या. या वर्षभराच्या कालावधीत ज्या आमदार, खासदार, लोकप्रतिनीधींनी जरांगे यांना लेखी पत्र दिले तिच माणसं आपल्याकडे मत मागायला येत आहेत, त्यांना मागील काळात काय केलं याचा जाब विचारा, असंही लक्ष्मण हाके म्हणाले.