पुणे- यापूर्वीच्या विधानसभा निवडणुकीकडे बारामती मतदारसंघात एवढे न फिरकणारे, दरवेळी समोरच्याचे डिपॉझिट जप्त करणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाऊले सध्या बारामतीतच खिळलेली दिसत आहेत. खुद्द शरद पवार यांनी अजित पवारांच्या पुतण्यालाच उभे केल्याने अजित पवार यांना बारामतीतच अडकून पडावे लागत आहे. कोणत्याही निवडणुकीत झाला नाही तेवढा त्रास या निवडणुकीत होत असल्याचे खुद्द अजित पवारांनीच कबुल केल्याने बारामतीत कोणाचे वारे, याचा आता लोकांना अंदाज येऊ लागला आहे.
अजित पवार कधी नव्हे तेवढा आपलाच मतदारसंघ फिरत आहेत. लोकांना आपण केलेल्या विकासकामांची आठवण करून देत आहेत. तसेच शरद पवार साहेबांनंतर मीच, माझ्याशिवाय एवढी विकासकामे करण्याची धमक कोणाच्यात नाही असे सांगत फिरत आहेत. गेली ३० वर्षे बारामतीकर अजित पवारांच्या पाठीशी आहेत, तेही शरद पवार यांच्यामुळे. लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवारांचा पराभव झाल्यानंतर अजित पवारांनी बहिणीविरोधात पत्नीला उभे करणे ही आपली चूक होती हे कबुलही केले आहे. परंतू काकांनी आता ३० वर्षे मला दिली, ३० वर्षे अजित पवारांना दिली आता पुढच्या पिढीकडे जबाबदारी, असे म्हणत काडी टाकली आहे. बारामतीकर आता अजित पवारांच्या बाजुने उभे राहतात की शरद पवारांच्या याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
लोकसभेला बारामतीकरांसमोर इकडे आड, तिकडे विहीर अशी परिस्थिती होती. तेव्हा तुम्ही आडाला खूश केले. आता विधानसभेला विहिरीला खूश करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले. तसेच आजपर्यंत आपण पवार साहेबांकडे पाहून मतदान मागत आलो आहोत. निवडणुकीला उभे कोण आहे, त्याचा फोटो लावा ना, त्याच्या नावावर मत मागा, असेही अजित पवार यांनी पुतण्या युगेंद्र पवार यांना म्हटले आहे.
याचबरोबर अजित पवारांनी एवढी विकासकामे मी जर दुसऱ्या मतदारसंघात केली असती तर तिकडून निवडून आलो असतो असे म्हटले आहे. इतकी वर्षे काम करून देखील मला एवढा त्रास झाला नाही तो आता होत आहे, असे अजित पवार म्हणाले. तसेच आता भावनिक झालात तर बारामतीला कोणी वाली राहणार नाही, असा इशाराही अजित पवारांनी दिला आहे. अजित पवारांच्या या वक्तव्यांवरून बारामतीत काय होणार, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.