राहुरी : फोडाफोडीमुळे लोकसभेत भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही त्यांना नाकारेल आणि राज्यात सत्तांतर होईल. प्राजक्त तनपुरे यांना आमदार करण्याची जबाबदारी राहुरीकरांनी घ्यावी. त्यांना कॅबिनेटमध्ये स्थान देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिली.
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ वांबोरी येथे बुधवारी (दि.१३) आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी किसनराव जवरे होते. एकनाथ ढवळे, दत्तात्रय कौडगे, बाळासाहेब जठार, अभिषेक भगत, राहुलभैया बैराट, रघुनाथ झिने, गोविंद मोकाटे आदींची यावेळी भाषणे झाली.
पुढे बोलताना पवार म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी दोन पक्ष फोडून सत्ता मिळविण्याचे काम केले; परंतु भाजपचे हे कृत्य जनतेला रुचलेले नाही. याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीत दिसून आला आहे. लोकसभा निवडणुकीत पक्ष फोडी करणाऱ्या भाजपला जनतेने नाकारले आहे. तीच जनता विधानसभेतही भाजप व त्यांच्या मित्र पक्षांना कोणत्याही परिस्थितीवर सत्तेवर येऊ देणार नाही. मी राज्यभर दौरे केले असून, राज्यात सत्तांतर होणारच, ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. राहुरीकरांनी आमदार तनपुरे यांना भरभरून साथ देण्याची गरज आहे. महाविकास आघाडी शासन काळात नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय झाला. त्यावेळी सर्वांत अगोदर मी प्राजक्तचे नाव घेतले होते. तनपुरे यांनी माझ्या विश्वासाला तडा जाऊ न देता सहा खात्यांवर आपल्या कामाचा ठसा उमटविला. त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेत त्यांना चांगली जागा देण्याची जबाबदारी माझी राहील, अशी ग्वाही पवार यांनी दिली.
सक्षणा सलगर म्हणाल्या, पक्ष फोडून सरकार स्थापन केले. भाजप सरकार आरक्षणाच्या मुद्यावर बोलण्यास तयार नाही. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार प्रसाद तनपुरे, राजेंद्र फाळके, दादा कळमकर, अरुण तनपुरे, हर्ष तनपुरे, अशोक बाबर, बाळासाहेब हराळ, दत्तात्रय अडसुरे, सोमनाथ धूत, गोविंद मोकाटे, अमोल जाधव, नितीन बाफना, बाबासाहेब भिटे, अभिषेक भगत, रघुनाथ झिने, हृषिकेश मोरे, उषाताई तनपुरे, वैशाली टेके, सोनाली तनपुरे, रावसाहेब (चाचा) तनपुरे, अभिजित ससाणे, विजय तमनर, विजय डौले, सुरेश लांबे, योगिता राजळे आदी उपस्थित होते.