बीड दि. १३ (प्रतिनिधी ) : राजकारण सरळ साधे असे कधी नसते , आणि राजकारणात बहुतांशवेळा जसे दाखवले जाते तसेही नसते. राजकारण्यांच्या बोलण्याचा, एखाद्या वाक्याचा कार्यकर्ते काय अर्थ घेतील हे देखील सांगता येत नाही. आता बीडमधील अजित पवारांच्या सभेच्या वेळी मंत्री धनंजय मुंडेंनी 'आम्ही दोघे (मुंडे बहीण भाऊ ) बीड जिल्ह्यात अनेकांचे ओझे हलके करणार आहोत ' असे विधान केले आहे. आता धनंजय मुंडेंच्या या विधानांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीत मुंडे बहीण भावांच्या (मंत्री धनंजय मुंडे आणि आ. पंकजा मुंडे ) भूमिकेकडे साऱ्या जिल्ह्याचे लक्ष आहे. सुमारे एक दशकभर एकमेकांना विरोध केलेले हे बहीण भाऊ महायुतीच्या माध्यमातून एकत्र आले आहेत. त्यासोबतच लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा झालेला पराभव दोघेही विसरायला तयार नाहीत, किंबहुना ते इतरांनाही तो पराभव विसरू देत नाहीत . त्यामुळेच बीड जिल्ह्यातील काही मतदारसंघात काही अपक्ष उमेदवार 'आम्ही ताई किंवा भाऊंचे उमेदवार आहोत ' म्हणून रिंगणात आहेत. काहींनी यैपैकी कोणाचे ना कोणाचे फोटो देखील वापरले आहेत . मुंडे बहीण भाऊ स्वतः मात्र 'आम्ही कोणीही उमेदवार उभे केलेले नाहीत , महायुतीचे उमेदवार हेच आमचे ' असे सांगत असले तरी अशा काही उमेद्वारांमुळे महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढलेली आहे हे नाकारता येणार नाही.
त्यातच आता बीडच्या सभेत भाजपच्या वतीने डॉ. योगेश क्षीरसागर यांना निवडणूक निधीसाठी एक धनादेश देण्यात आला. यावेळी मंत्री धनंजय मुंडे यांनी ' योगेश क्षीरसागर भाग्यवान आहेत , मला भाजपकडून धनादेश मिळण्याचे भाग्य परळीत मिळाले नाही ' असे वक्तव्य केले. यावर योगेश क्षीरसागर यांनी 'ताई आणि भाऊंनी माझे ओझे हलके केले ' असे म्हणतातच 'आम्ही जिल्ह्यात अनेकांचे ओझे हलके करणार आहोत ' असे धनंजय मुंडे म्हणाले. आता धनंजय मुंडे यांचे हे विधान 'सहज ' होते का 'सूचक ' हे त्यांचे तेच जाणोत, पण त्यांच्या या विधानाने अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत. बीड विधानसभा मतदारसंघात भलेही ताई भाऊंच्या नावाने बंडखोरी करणारे कोणी नसतील पण जिल्ह्यातील इतर काही मतदारसंघात तर ताई आणि भाऊंच्या नावाने 'करेक्ट कार्यक्रम ' करण्याची भाषा काही अपक्ष करीत आहेतच. आता ओझे हलके करण्याचा आणि या भाषेचा काही संबंध लावायचा का हे मतदारांनी ठरवायचे आहे.