Advertisement

भले बुरे जे घडून गेले ...  

प्रजापत्र | Thursday, 14/11/2024
बातमी शेअर करा

बीड दि. १३ (प्रतिनिधी ) ; निवडणुकीच्या राजकारणात शिष्टाईला फार महत्व असते . नाराजांना कामाला लावायचे तर कोणीतरी शिष्टाई करावी लागते आणि त्यातून मार्ग काढावा लागतो. बीड मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासाठी तशी शिष्टाई केली अमरसिंह पंडितांनी आणि मार्ग काढला धनंजय मुंडेंनी . 'शिवछत्र'वर बीड मतदारसंघातील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधीलच काही नाराजांची एक बैठक झाली आणि बैठक संपल्यावर 'भरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण ' म्हणत नाराज नेते थेट महायुतीच्या सभेच्या मंचावर आले.
बीड विधानसभा मतदारसंघात मागच्या काळात ज्या काही राजकीय घडामोडी घडल्या त्यामुळे कार्यकर्ते आणि नेते देखील अस्वस्थ होते. कोण कोठे आणि आता कोणाचे काय असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असतानाच बीडमध्ये मात्र बबन गवते असतील, अमर नाईकवाडे किंवा फारूक पटेल, हे तसे पोलकमंत्री धनंजय मुंडे यांच्या संपर्कात होते . मधल्या काळात नाईकवाडे , पटेल काही काळ शिवसेनेत जाऊन आले, पण ते काही काळासाठीच. नंतर राष्ट्रवादीमध्ये फूट पडली , अजित पवारांचा वेगळा गट निर्माण झाला, आणि बीडमधून नाईकवाडे, पटेल आदींनी अजित पवारांच्या पक्षात जाणे पसंत केले. बबनराव गवते तर पहिल्यापासून पक्षात होतेच. या सर्वांनी आपला नेता मानले ते धनंजय मुंडेंना. मात्र मतदारसंघात डॉ. योगेश क्षीरसागर यांच्याशी त्यांचे फारसे सूत जुळले नव्हते. त्यामुळे विधानसभेच्या रणधुमाळीत या सर्वांची भूमिका कात्य राहणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. अखेर या सर्वांना सक्रिय करण्यासाठी पुढाकार गहेतला तो माजी आमदार अमरसिंह पंडितांनी. धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत शिवछ्त्रवर या सर्वांची बैठक झाली, उमेदवार डॉ. योगेश क्षीरसागर देखील यावेळी उपस्थित होते. अखेर काय घडले, कसे घडले, पुढे कसे करायचे यावर चर्चा होऊन 'आमचा मानसन्मान कायम राखला जावा, विकासात दुजाभाव होऊ नये, जिल्हापरिषद, नगरपालिकेत सर्वांचे ऐकले जावे ' असे काही शब्द दिले घेतले गेले आणि 'भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे आपण ' च्या स्टाईलमध्ये सारे योगेश क्षीरसागर यांच्या प्रचारार्थ आयोजित अजित पवारांच्या सभेच्या मंचावर पाहायला मिळाले.

Advertisement

Advertisement