Advertisement

महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा पंतप्रधानांचा घाट

प्रजापत्र | Wednesday, 13/11/2024
बातमी शेअर करा

 दिंडोरी : पंतप्रधान देशाचे असतात मात्र, मोदी केवळ एकाच राज्याच्या विकासात मग्न आहेत. महाराष्ट्राचे पाणी गुजरातला वळवण्याचा त्यांचा घाट आहे. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास नदीजोड प्रकल्प राबवून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच देऊ असे आश्वासन खासदार शरद पवार यांनी दिले. दिंडोरी येथे महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बाेलत होते.

 

 

खा. पवार म्हणाले की, केंद्र सरकारने 16 उद्योगपतींचे 14 हजार कोटी रुपये माफ केले. मात्र, शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला यांच्याकडे पैसे नाहीत. शेतकरी कर्जबाजारी झाला असून आत्महत्या करीत आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना सरसकट तीन लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात येईल, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर दिले जातील. जातिनिहाय जनगणना करण्याचा आमचा मानस असून, राज्यात महिला सुरक्षित नाहीत. गेल्या सहा महिन्यांत 960 महिला बेपत्ता झाल्या आहेत. राज्य सरकार या महिलांचा शोध घेण्यास असमर्थ ठरले आहे. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. कांद्याला चांगला भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. पर्यायाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले, अशा शेतकरीविरोधी भूमिका घेणाऱ्या सरकाला धडा शिकविण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन शेवटी पवार यांनी केले.

Advertisement

Advertisement