विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला वेग आला आहे. जाहीरनामे प्रसिद्ध होत आहेत. आश्वासने, शब्द, गॅरंटी, वचने दिली जात आहे. महाराष्ट्रात आमचीच सत्ता येणार, असे दावे महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केले जात आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यातच मुख्यमंत्रीपदाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचे नाव आम आदमी पक्षाच्या नेत्याने घेतले आहे. यासाठी हरयाणातील उदाहरण दिले आहे.
दहा वर्षानंतर तुम्ही म्हणता ‘एक हैं तो सेफ हैं’. तुम्ही हिंदूंना घाबरवत आहात. पंतप्रधानांना अशी भाषा शोभते का? तुम्ही हिंदूंना सुरक्षित ठेवत नसाल तर तुम्ही राजीनामा द्या. पंतप्रधान सुरक्षित ठेवू शकत नसेल त्यांनी राजीनामा द्यावा. ‘बटेंगे तो कटेंगे’ हा नारा आहे का? अशी विचारणा आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा
हरियाणातील विधानसभा निवडणुकीत जो प्रकार घडला त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात टाळायची असेल तर महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करावे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नंतर जाहीर केला तर एकमेकांचे आमदार महाविकास आघाडीत फूट पाडू शकतात. हरियाणामध्ये हेच झाले की, काँग्रेसचे गट एकमेकांना पाडायला निघाले, त्यात काँग्रेसचे नुकसान झाले. त्यामुळे माझे म्हणणे आहे की, नंबर गेममध्ये तुम्ही फसू नका, असे संजय सिंह यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले
उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये जबरदस्त काम केले आहे. मराठी माणूस, मराठी स्वाभिमान या गोष्टी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जोडल्या जातात. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले, तर महाविकास आघाडीचा फायदा होईल, हे माझे वैयक्तिक मत आहे. भाजपाला पराभूत करायचे, असे आम्ही ठरवले आहे. आम्हाला महाविकास आघाडीमध्ये स्थान देत होते पण आम्ही घेतली नाही, असे संजय सिंह यांनी म्हटले आहे. तसेच राज ठाकरे यांची महायुतीसोबतच भांडण सुरू आहेत. त्यांच्या मुलाला जागा हवी होती तिथे ती जागा त्यांना दिली नाही. राज ठाकरे भाजपाचे समर्थन करायला जातात, पण ते वेगवेगळा स्टॅन्ड घेतात. थोडी काही मते मनसे फोडू शकते, शिंदे गट फोडू शकतो. पण मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांना घोषित केले, तर ही मतांची फोडाफोडी कमी होऊ शकते, असा दावा संजय सिंह यांनी केला.
दरम्यान, महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचे राजकारण झाले ते सगळ्यांनी पाहिले. अनेक योजना, प्रकल्प पंतप्रधान आपल्या गुजरात राज्यात घेऊन गेले. एका राज्याचे नुकसान करून हे करणे योग्य नाही, अशी टीका संजय सिंह यांनी केली.