माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते रावसाहेब दानवे नेहमी त्यांच्या शैलीमुळे चर्चेत असतात. दानवे यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांच्यावर आता विरोधकांसह नेटकऱ्यांकडून टीका होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत रावसाहेब दानवे हे अर्जून खोतकर यांचे स्वागत करत होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्याला लाथ मारून बाजूला केले. याबद्दल शरद पवार, संजय राऊत यांच्यासह विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला.
याच व्हिडीओ बद्दल खासदार संजय राऊत म्हणाले, "त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना विचारा की, हे तुमच्या पक्षाची संस्कृती आहे का? एकनाथ शिंदेंना विचारा. रावसाहेब दानवे यांच्याविषयी आम्ही कितीवेळा बोलायचं. तुम्ही त्या पक्षाचे नेते आहेत, देवेंद्र फडणवीस त्यांना विचारा. कार्यकर्त्याला अशा प्रकारे लाथा घालताना तुम्हाला कसं वाटतंय, गार गार वाटतंय का? तुमच्या पक्षात कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे. काय स्थान आहे, हे दिसतंय यावरून", असा उपरोधिक चिमटा संजय राऊतांनी भाजपला काढला.
रावसाहेब दानवे यांच्या या व्हिडीओबद्दल जेव्हा शरद पवारांना विचारण्यात आले. तेव्हा ते म्हणाले, "असं आहे की, त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं, त्याचं लक्षण आहे. यापेक्षा काही सांगायचं नाही", असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला.