यवतमाळ: विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढलेला असताना शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज ते वणीला सभेसाठी गेलेले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. त्यातील सामान निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासलं. त्यावेळी ठाकरे काहीसे संतापले. माझी बॅग तपासली तशी मोदी, शहांची बॅग सुद्धा तपासा असं आव्हान ठाकरेंनी दिलं.
वणीत सभेसाठी पोहोचलेल्या उद्धव ठाकरेंच्या बॅगांच्या तपासणीसाठी निवडणूक अधिकारी सरसावले. तेव्हा उद्धव यांनी त्यांना कधी मुख्यमंत्र्यांची बॅग तपासली का, असा सवाल केला. तुम्ही तुमचं काम करताय, ते बरोबर आहे. पण मोदी, शहा येतील, तेव्हा त्यांचीही बॅग तपासा. त्यांची बॅग तपासत असतानाचा व्हिडीओ माझ्याकडे आला पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
यानंतर अधिकाऱ्यानं हेलिकॉप्टरमधील सामानाची तपासणी सुरु केली. एका बॅगमध्ये असलेली डबासदृश्य वस्तूही त्यांनी ठाकरेंसोबत असलेल्या व्यक्तीला उघडायला सांगितली. त्यावर 'काय उघडायचं ते उघडा. नंतर मी उघडतो तुम्हाला', असं ठाकरे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला म्हणाले. हे अधिकारी कोणत्या शासकीय नोकरीत आहेत बघून घ्या, अशी सूचना ठाकरेंनी त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीला केली.