छत्रपती संभाजीनगर : गुप्तधन शोधण्याचे कारण करून संतोष सुरेश खिल्लारे (३४) यांना मित्र मोहन साळवे (४४, रा. मुकुंदवाडी) याने ५ नोव्हेंबर रोजी घनदाट जंगलात नेले. त्यानंतर पहिले दारूतून विष पाजून, दगडाने डोके ठेचून हत्या केली. रविवारी सकाळी आडगाव बुद्रक शिवारात मृतदेह सापडल्यानंतर ही हत्या उघडकीस आली.
सिंदीबनमध्ये पत्नी, तीन मुले, भावासह राहणारे संतोष खासगी कंपनीत वेल्डर होते. त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य व मोहन गट्टू तयार करणाऱ्या कंपनीत सोबत कामाला आहेत. त्यामुळे त्यांच्यात चांगली ओळख होती. मात्र, संतोषचा वैयक्तिक वादातून मोहन वर संशय होता. संतोष यांनी मोहनला एकदा जिवे मारण्याची धमकी दिली होती. संतोष आपल्याला मारेल, त्यापूर्वी त्याची हत्या करण्याचा कट मोहनने आखला होता. ५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी आपल्याला गुप्तधन शोधण्यासाठी जायचे असल्याचे कारण करून त्याने संतोष यांना आडगाव बुद्रुक शिवारात नेऊन दारू पाजली. त्यानंतर दगडाने डोके ठेचून हत्या केली.
विष पाजले, डोके ठेचले मग ढकलून दिले
पोलिसी खाक्या दाखवताच मोहनने हत्येची कबुली देत घटनाक्रमाचा उलगडा केला. पहिले दारूच्या तीन बाटल्या विकत घेऊन जंगलात नेले. घटनास्थळी पोलिसांना रिकामी विषाची बाटली आढळली. त्यामुळे दारूतून पहिले विष पाजले, नंतर दगडाने डोके ठेचून मारले. मृत्यू झाला नसावा, या संशयातून संतोषला दरीत ढकलून दिले. रविवारी सकाळीच निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळ गाठले. तेव्हा संतोष यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दरीत झाडाला लटकलेला आढळला. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह काढून घाटीत नेण्यात आला.