बीड : राजकारणात काही काही गोष्टी अशा असतात, की त्यांच्याबद्दलचे गूढ सहसा वर्षानुवर्षे कमी होत नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे जिवंत असताना असेच गूढ त्यांच्या 'जादूच्या कांडी ' बद्दल होते, तसेच गूढ मागच्या ४-५ दशकांपासून बीड जिल्ह्यातील शरद पवारांच्या मुक्कामाच्या संदर्भाने आहे. शरद पवारांचा जिल्ह्यात मुक्काम होणार म्हटले की काही तरी राजकीय उलथापालथी होणार असे जणू समीकरणच झालेले आहे. आता आज शरद पवार बीड जिल्ह्यात मुक्कामी आहेत, त्या मुक्कामात ते काय उलथापालथी घडवितात याचीच चर्चा सध्या जोरात आहे.
शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरचे नेतृत्व असले तरी त्यांना जितकी महाराष्ट्राची ओळख आहे, तितकी त्यांचा पिढीतल्या इतर कोणत्या राजकारण्याला क्वचितच असेल. कोणत्या भागात कोणते कार्यकर्ते 'आपले ' आहेत, कोण कोणासोबत आहे, कोणाचा कोणत्या भागावर प्रभाव आहे आणि कोणाचं दुखरी नस कोणती आहे हे शरद पवारांना चांगलेच माहित असते, त्यामुळेच राजकारणात कोणत्याही भागात कोणालाही धक्का देण्याची क्षमता शरद पवार ठेवून आहेत असे म्हणतात . त्यामुळेच त्यांच्या एखाद्या जिल्ह्यातील मुक्कामाला देखील तितकेच राजकीय महत्व आलेले असते.
बीडब्द्दल बोलायचे तर शरद पवारांचा निवडणुकीच्या काळातील जिल्ह्यातील मुक्काम म्हणजे दुरावलेल्या नव्या जुन्यांना एकत्र आणणारा, दिलजमाई करणारा असतो. अनेकांना 'कामाला ' लावणारा असतो.१९८९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी जिल्ह्यात मुक्काम केला आणि त्यावेळी आपल्याच पक्षाच्या असलेल्या केशरकाकू क्षीरसागर यांच्या अडचणी वाढवून बबनराव ढाकणेंचा विजय सोपा केला. तर २००४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा जिल्ह्यातील मुक्काम गोपीनाथ मुंडेंच्या जिल्ह्यात स्वतः मुंडेंनी प्रतिष्ठा पणाला लावलेली असतानाही भाजपच्या उमेदवाराचा पराभव करणारा ठरला, विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडेंचे एकेकाळचे मित्र असलेल्या जयसिंग गायकवाडांना राष्ट्रवादीमध्ये घेऊन त्यांचा विजय निश्चित करण्यात शरद पवारांच्या त्या मुक्क्कामाचा मोठा वाटा होता. असे लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने बरेचदा घडले. तर विधानसभेच्या बाबतीत १९८० ला शरद पवारांनी बीड जिल्ह्यात मुक्काम ठोकून सुंदरराव सोळंके, बाबुराव आडसकर , जयदत्त क्षीरसागर आदी मातब्बरांना पराभवाची चव चाखायला लावली होती. आता इतकी सारी उद्धरणे असल्यावर शरद पवारांच्या मुक्कामाची चर्चा तर होणारच, त्यातून काहींना धास्ती वाटणार तर काहींच्या आशा पल्लवित होणारच.
तर अशा वातावरणात आज शरद पवार बीड मुक्कामी आहेत. , त्यामुळे आजच्या त्यांच्या मुक्कामात ते काय समीकरणे जुळवितात याची उत्सुकता सर्वांना आहे.
पवारांना कधी साथ तर कधी धक्के
बीड जिल्हा शरद पवारांच्या विचारांसोबत जाणारा आहे असे जरी अनेकदा म्हटले जात असले तरी जिल्ह्याने अनेकदा शरद पवारांना धक्के दिलेले आहेत. १९८० च्या निवडणुकीत बीड जिल्ह्याने शरद पवारांच्या सांगण्यावर सर्वच्या सर्व आमदार निवडणून दिले. त्यावेळी जिल्ह्यातील मातब्बरांचा पराभव शरद पवारांनी घडवून आणला , मात्र १९८५ च्या निवडणुकीत परिस्थिती तशी राहिली नाही, ९० ला गोपीनाथ मुंडेंचा प्रभाव जाणवायला लागला होता , त्यावेळी शरद पवारांचे ४ तर युतीचे ३ आमदार निवडून आले. ९५ ची निवडणूक तर बीड जिल्ह्यात शरद पवारांची धक्कादायक होती, या निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला झाला आणि मुंडेसारख्या नेतृत्वात भाजपने देखील यश मिळविले. ९९ ला शरद पवारांचे ३ तर युतीचे ४ आमदार झाले, २००४ मध्ये शरद पवारांचे २ आणि युतीचे ५ आमदार झाले, तर २००९ मध्ये पवारांनी परिस्थितीला पुन्हा वेगळे वळण दिले, ५ आमदार त्यांच्या राष्ट्रवादीचे निवडणून आले, भाजपच्या पंकजा मुंडे या एकमेव आमदार झाल्या. २०१४ ला दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या अकाली निधनाची सहानुभूती पंकजा मुंडेंच्या बाजूने होती, त्यांनी शरद पवारांना केवळ एका जागेवर समाधान मानायला भाग पाडले तर युतीच्या ५ जागा आल्या . २०१९ ला शरद पवारच्या पक्षाला ४ जागा मिळाल्या , तर भाजपच्या वाट्याला २ जागा आल्या. अगदी पंकजा मुंडे यांना देखील पराभूत व्हावे लागले. या सर्व पार्श्वभूमीवर आता २०२४ ची निवडणूक होत आहे, त्यात पवार काय चमत्कार करणार याची आता उत्सुकता असेल.