वांद्रे- कुर्ला संकुलातील महाराष्ट्र स्वाभिमान सभेतून लोकसेवेची पंचसूत्री जाहीर करून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकल्यानंतर काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या झंझावाती प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लेकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी, कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याच्या विविध भागांत काँग्रेस व महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.
टिळक भवन येथे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत व काँग्रेसच्या प्रचार समितीचे अध्यक्ष खा. चंद्रकांत हंडोरे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या प्रचार समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना चेन्नीथला म्हणाले की, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे हे पाच दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून १३, १४, १६, १७ व १८ नोव्हेंबरला राज्यातील विविध भागात त्यांच्या सभा होतील. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे १२, १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रचार सभा घेणार आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी या १३, १६ व १७ नोव्हेंबरला प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. तेलंगणा व कर्नाटकचे मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे देशभरातील वरिष्ठ नेतेही प्रचारात उतरणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली आहे.