विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपली आहे. महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो अनेक पक्षातील नाराज उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकवत सरळ अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्याचे पाहायला मिळत आहे. अर्ज माघे घेण्याची अंतिम मुदत अद्याप संपलेली नाही. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून बंडखोरांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. अनेक ऑफर दिल्या जात आहेत. यातच राज्यातील काही मतदारसंघांकडे राज्याचे लक्ष लागले आहे. यातील एक म्हणजे तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघ. या ठिकाणी दिवंगत नेते आर. आर. पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाने उमेदवारी दिली आहे.
विरोधकांच्या मतांमध्ये फाटाफूट व्हावी, यासाठी राजकीय नेते, पक्ष विविध माध्यमांतून प्रयत्न करत असतात. एकाच नावाचे उमेदवार निवडणुकीत रिंणगात उतरविणे, ही एक ट्रिक हमखास वापरली जाते. हीच पद्धत तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात वापरण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या मतदारसंघात एकाच नावाचे प्रत्येकी तीन उमेदवार रिंणगात आहेत.