Advertisement

बंडखोरांसाठी देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान!

प्रजापत्र | Thursday, 31/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई- निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी देण्याच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीत धुसफूस सुरू आहे. अनेक निष्ठावान पदाधिकाऱ्यांना संधी न देता आयारामांना संधी देण्यात आल्याने जुन्या-जाणत्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यातूनच आघाडी आणि युतीत बंडखोरी करून इच्छूक उमेदवारांनी अपक्ष अर्ज भरलाय. तर काहींनी पक्षांतर करून दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी पदरात पाडून घेतली आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी आज सुचक वक्तव्य केलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मुंबई महापालिकेचे माजी स्थायी समिती अध्यक्ष रवी राजा यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

 

 

बोरीवलीतून गोपाळ शेट्टींसह मुंबई आणि ठाण्यातील अनेक जुने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. या नाराजीतून त्यांनी अपक्ष अर्ज भरले आहेत. याबाबत आज देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही ठिकाणी बंडखोरी झाली आहे. एकमेकांच्या उमेदावारांविरोधात अर्ज भरण्यात आले आहेत. यासाठी आता नीती तयार केली आहे. ज्यांनी तिकिट नसताना उमेदवारी भरलीय त्यांना पक्षात परत घेण्याचा प्रयत्न तिन्ही पक्ष मिळून करणार आहेत. पक्षांतर्गतही काही उमेदवार उभे राहिले आहेत. त्यांनाही विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांना परत घेण्याचा प्रयत्न असेल.”

Advertisement

Advertisement