Advertisement

३२ तासानंतर वनगांचा ठावठिकाणा

प्रजापत्र | Wednesday, 30/10/2024
बातमी शेअर करा

बोईसर : शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाकडून पालघर विधानसभेतून उमेदवारी नाकारल्यानंतर व्यथित होऊन अज्ञात स्थळी निघून गेलेले आमदार श्रीनिवास वनगा बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास तब्बल ३२ तासानंतर आपल्या घरी परतले. मात्र कुटुंबीयांना भेटून ते पुन्हा अज्ञात स्थळी पुन्हा निघून गेले असून आपण सुखरूप असून विश्रांतीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी देखील या घटनेला दुजोरा दिला असून वनगा यांच्या घराबाहेर बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांना कळवून त्यांनी पुन्हा आपले घर सोडले. पालघर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी न देता भाजपमधून आयात माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे.

 

 

कोणतीही चर्चा न करता किंवा विश्वासात न घेता उमेदवारी डावल्यामुळे पक्षाकडून अन्याय झाल्याच्या भावनेने प्रचंड व्यथीत झालेले वनगा यांनी सोमवारी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास कुटुंबीयांना काहीही न कळवता घर सोडून अज्ञात ठिकाणी गेले होते. तेव्हापासून त्यांचा काहीच ठावठिकाणा कळत नसल्यामुळे कुटुंबीयासोबतच, त्यांचे नातेवाईक व सर्वपक्षीय राजकीय नेते चिंताग्रस्त झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी राजकीय नेत्यांची रांग लागली होती. पालघरची पोलीस यंत्रणा त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत होती मात्र बुधवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे तलासरी तालुक्यातील कवाडा येथील आपल्या निवासस्थानी परतले व कुटुंबीयांची भेट घेत मी सुखरूप आहे काळजी करण्याचे कारण नाही. मला विश्रांतीची गरज असून मी दोन दिवसांसाठी पुन्हा बाहेर जात असल्याचे सांगून आपल्या मित्रा समवेत अज्ञातस्थळी रवाना झाले. उमेदवारी न मिळाल्यामुळे व्यथित होऊन नॉट रिचेबल झालेले वनगा सुखरूप असल्याचे समजल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसोबतच पोलीस यंत्रणाचा जीव देखील भांड्यात पडला आहे मात्र ते पुन्हा कुठे गेले किंवा यामागे काही रणनीती आहे का याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे.

Advertisement

Advertisement