मुंबई- महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांतील जागावाटप १५२, ८० आणि ५२ असे होणार असल्याचे सांगितले जाते. मात्र, चार नोव्हेंबरला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत यासंदर्भात घडामोडी घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेला जागा देताना जेथे त्यांच्याकडे उमेदवार नसेल तेथे तो देण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे आता पुढील दोन दिवसांत बंडोबांना थंड करण्यावर भर दिला जाईल, असे समजते.
भाजपने या जागावाटपात मोठ्या भावाची भूमिका निभावली हे स्पष्ट दिसते आहे. महायुतीत विदर्भात अंतर्गत बंडाळीचा फारसा सामना करावा लागत नसला तरी पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात मात्र महायुतीचे उमेदवार परस्परांसमोर उभे ठाकले आहेत.
मानखुर्दमधून नवाब मलिक (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध सुरेश पाटील (शिवसेना), मीरा भाईंदर येथे गीता जैन (शिवसेना) आणि नरेंद्र मेहता (भाजप) अणुशक्तीनगरमध्ये सना मलिक (राष्ट्रवादी) विरुद्ध अविनाश राणे (शिवसेना) दिंडोरी मतदारसंघात नरहरी झिरवाळ (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध धनराज महाले (शिवसेना), देवळालीत सरोज अहिरे (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध जयश्री अहिरराव (भाजप) विदर्भातील वरुड मोर्शी येथील देवेंद्र भुयार (राष्ट्रवादी काँग्रेस) विरुद्ध उमेश यावलकर (भाजप), आष्टीत सुरेश धस (भाजप) विरुद्ध बाळासाहेब आजबे (राष्ट्रवादी काँग्रेस), नांदगावमध्ये सुहास कांदे विरुद्ध समीर भुजबळ, कर्जतमध्ये महेंद्र थोरवे (शिवसेना) विरुद्ध किरण ठाकरे (भाजप), अलिबागमध्ये दिलीप भोईर (भाजप) विरुद्ध महेंद्र दळवी (शिवसेना), कल्याण पश्चिम विश्वनाथ भोईर (शिवसेना) विरुद्ध नरेंद्र पवार (भाजप) असा संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.
बोरिवली या मतदारसंघात मात्र भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी बंड करत अर्ज दाखल केल्यामुळे त्यांच्याच पक्षाने रिंगणात उतरविलेल्या संजय उपाध्याय यांची परिस्थिती काहीशी चिंताजनक झाली आहे. मुंबादेवी मतदारसंघ शायना एनसी यांना शिवसेनेने दिला होता. तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते अतुल शहा अर्ज दाखल करणार होते. मात्र पक्षश्रेष्ठींनी दिलेल्या आदेशानंतर त्यांनी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचा विरोध डावलून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री नवाब मलिक यांना मानखुर्द मतदारसंघामधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या मतदारसंघातही बंडखोरी झाली आहे.