Advertisement

 बसमध्ये आढळला ३० किलो गांजा

प्रजापत्र | Monday, 28/10/2024
बातमी शेअर करा

  उमरगा, (जि.धाराशिव) : तालुक्यातील तलमोड सिमा तपासणी नाक्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या वाहनांच्या तपासणीत रविवारी (ता. २७) दुपारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या हैद्राबाद - अकलुज बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीकडे ३० किलो गांजा आढळून आला.

 

 अधिक माहिती अशी की, उमरगा विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्याने निवडणूक विभागाने सोलापूर -हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर तलमोड गावानजिक तपासणी नाका सुरू केला आहे. रविवारी दुपारी हैद्राबादहुन अकलुजकडे (जि. सोलापूर) निघालेल्या बसची आरटीओ व स्थिर सर्वेक्षणा पथकाने (एस.एस.टी.) तपासणी सुरू केल्यानंतर एका व्यक्तीकडे व्हीआयपी बॅगमध्ये गांजा आढळून आला. तो ३० किलो आहे. गांजा घेऊन जाणारा हिरवे नामक व्यक्ती उमरगा तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती सांगण्यात आली. पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा उशीरापर्यंत पंचनामा सुरु होता. आरटीओ संतोष पाटील, स्थिर सर्वेक्षण पथक प्रमुख एन.एस. राठोड, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, कनिष्ठ सहाय्यक विकास जाधव, पोलिस कर्मचारी योगेश सुर्यवंशी यांच्या पथकाने ही कारवाई केली. उपविभागीय अधिकारी सदाशिव शेलार, पोलिस निरीक्षक अश्विनी भोसले यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

Advertisement

Advertisement