जालना- विधानसभा निवडणुकीला कुठल्याही परिस्थितीत सामोरे जाण्याचा निर्णय मराठा आंदोलक जरांगे पाटील यांनी घेतल्यानंतर कालपासून रात्रंदिवस इच्छुकांच्या मुलाखती सुरू असून अंतरवली सराटीला जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत कुठल्या मतदारसंघात कोण? उमेदवार असेल याची यादी अंतरवली सराटीतून निघण्याची दाट शक्यता आहे.
निवडणुकीमध्ये आमदार पाडायचे की लढायचे? यावर मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी निर्णय देत काही ठिकाणी लढायचे, काही ठिकाणी पाडायचे तर काही ठिकाणी मराठा आरक्षणाला पाठिंबा देणार्यांना मदत करायची हे धोरण आखले. त्यानुसार राज्यभरातून मनोज जरांगे पाटील याचंया नेतृत्वात उभे राहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक अंतरवली सराटीत डेरेदाखल आहेत. रात्रीपासून मुलाखती सुरू आहेत. दिवस रात्र मुलाखतींचा ज्वर आणि चर्चा अंतरवली सराटीमध्ये पहायला मिळत आहे. आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची दाट शक्यता आहे.