बीड : माजलगाव मतदारसंघातून आ. प्रकाश सोळंके यांनी राजकीय निवृत्ती जाहीर केलेली असतानाही ऐनवेळी पक्षाची उमेदवारी त्यांनाच जाहीर झाली, आणि विधानसभा लढविण्यासाठी इच्छुक असलेले त्यांचे पुतणे जयसिंग सोळंके यांचा मात्र गेम झाला. आता हा गेम नेमका कसा झाला यासंदर्भातील एक कथित ऑडिओक्लिप व्हायरल झाली आहे. सदर क्लिपमधील आवाज अजित पवार यांचा असल्याचे सांगितले जाते, मात्र 'प्रजापत्र ' या क्लिपचे पुष्टी करीत नाही.
या कथित ऑडिओक्लिनुसार जयसिंग सोळंके यांना तिकीट द्यायचे निश्चित झाले होते, मात्र आ. प्रकाश सोळंके यांनी स्वतः 'रमेश आडसकर यांच्या विरोधात लढत द्यायची तर आपण स्वतःच उमेदवार असावे लागते ' असे अजित पवारांना सांगितले. तसेच स्वतः पंकजा मुंडे यांनीही प्रकाश सोळंकेच उमेदवार हवे अशी भूमिका घेतली, मतदारसंघातील इतरांनीही प्रकाश सोळंके हेच उमेदवार पाहिजेत असे सांगितले असे अजित पवारांच्या कथित आवाजातील व्यक्ती बोलताना आढळत आहे. विशेष म्हणजे जयसिंग माझ्या बहिणीचा मुलगा आहे, मी तर कोरा एबी फॉर्म दिला होता, आता उमेदवारी कोणाला घ्यायची हा सोळंके कुटुंबातला अंतर्गत बिषय आहे. आम्ही जयसिंग सोळंकेंना उमेदवारी दिली असती आणि प्रकाश सोळंके यांनी 'मी काम करीत नाही ' अशी भूमिका घेतली असती तर काय करायचे असते असा सवाल देखील अजित पवारांच्या आवाजात विचारण्यात आला आहे. या ऑडिओक्लिपची अधिकृत पुष्टी करता येत नसली तरी या क्लिपमुळे जयसिंग सोळंकेंचा राजकीय गेम नेमका कसा झाला याचे वेगवेगळे अंदाज लावले जाऊ लागले आहेत.
बातमी शेअर करा