बीड दि.२१ (प्रतिनिधी) : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूकीसाठीची राजकीय भूमिका जाहिर केली आहे. जरांगे कोठे पाठिंबा तर कोठे पाडापाडी तर काही ठिकाणी अपक्ष उमेदवार उभा करणार आहेत. मात्र बहुतांश ठिकाणी इच्छुकांच्या भाऊगर्दीतून निवडून येऊ शकणारा ' आपला' माणूस निवडताना त्यांचाही कसं लागणार आहे.
राजकारणात अनेकदा 'झाकली मुठ लाखाची' मानली जाते. एखादे शक्तिप्रदर्शन केले आणि ते अपेक्षित उंचीवर पोहचू शकले नाही तर होणारे राजकीय नुकसान मोठे असते. आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्यासमोर देखील हाच प्रश्न उपस्थित होईल अशी परिस्थिती आहे. मराठा आरक्षण आंदोलनाचा राज्याच्या वेगवेगळ्या भागात असलेला प्रभाव पाहता मनोज जरांगे यांचा आशीर्वाद मिळावा यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले असून आंतरवरलीच्या खेटया वाढविल्या आहेत. मनोज जरांगे यांनी मात्र जिथे विजयाची खात्री तेथे अपक्ष उमेदवार, काही ठिकाणी इतरांना पाठिंबा तर काही ठिकाणी पाडापाडी अशी भूमिका घेतली आहे. पण निवडून येऊ शकणारा 'आपला' निवडणे मनोज जरांगेंसाठी देखील सोपे असणार नाही.
बीड जिल्हयाचेच घ्यायचे तर प्रत्येक मतदारसंघातून जरांगेंच्या आशीर्वादाची वाट पाहणारे भरपूर आहेत. मध्यंतरी ज्या 'घोंगडी बैठका' झाल्या त्यावेळी हे पहायला मिळालेच. एकाच घोंगडीवर बसलेल्या सर्वांनाच आमदार व्हायचे आणि सारेच तुल्यबळ... म्हणजे बीडमधून बी. बी. जाधव, बळीराम गवते, अनिल जगताप, प्रा. सुरेश नवले, भागवत तावरे आणि आणखी बरेच, यातून कोण निवडून येणार हे ठरवायचे कसे? माजलगाव मध्ये रमेश आडसकर, मोहन जगताप, प्रकाश सोळंके सारेच मराठा, गेवराईत शिवाजीराव पंडीत कुटुंबाला विरोध करायचा का? असे अनेक प्रश्न जरांगे यांच्यासमोर असतील.
लोकसभा निवडणूक जातीय वळणावर गेल्यानंतरही अगदी बीड जिल्ह्यातही मराठा मतांचे विभाजन झाले होतेच. आता विधानसभेला तर बहुतांश लढती मराठा विरुद्ध मराठाच, म्हणजे प्रत्येकाचे स्वत:चे असे वेगळे मतदान असणारच... मग अशावेळी आशीर्वादाचा हात ठेवण्यासाठीचे डोके निवडणे सोपे नक्कीच नसेल.
-----------------------------------------
प्रजापत्र | Tuesday, 22/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा