मुंबई- तीन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंकडून शिवसेना पक्ष काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदेंना दिले होते. यावेळी आयोगाने ठाकरेंना मशाल हे चिन्ह दिले होते. या चिन्हामध्ये उद्धव ठाकरे यांनी काही बदल करण्याची मागणी केली होती. त्यात निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह देण्यात आले आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशालच चिन्ह कायम ठेवण्यात आले असून आयस्क्रीमच्या कोनासारखे वाटणारे चिन्ह आता बॅटरीसारखे दिसणार आहे. मशाल हातात धरण्याचा जो आकार होता तो आईस्क्रीमच्या कोनासारखा वाटत होता. तो बदलून आता वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच आतील भगवा रंग काढण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या या चिन्हावरून विरोधकांनी खिल्ली उडविली होती. मशाल हे चिन्ह आईस्क्रीमच्या कोनासारखे दिसते असे विरोधकांनी म्हटले होते. यामुळे हा बदल करण्यात आला आहे. नव्या सुधारित चिन्हामध्ये टॉर्च स्पष्टपणे दिसत आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीत ईव्हीएमवरही टॉर्च सारखेच दिसणारे नवे निवडणूक चिन्ह दिसणार आहे.
पेटत्या मशालीचा आणि शिवसेनेचा खूप आधी पासूनचा संबंध आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेनेने १९८५ मध्ये पेटत्या मशालीच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. यानंतरच्या काळात रेल्वे इंजिन, ताडाचे झाडाची जोडी, धनुष्यबाण आदी चिन्हे शिवसेनेला मिळत गेली. शिंदे गटाला शिवसेनेचे धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देताना आयोगाने ठाकरे गटाला पर्याय विचारले होते. तेव्हा ठाकरे गटाने पेटत्या मशालीचा पर्याय आयोगाला दिला होता. याच चिन्हावर ठाकरेंनी लोकसभा लढविली होती. आता थोडासा बदल असला तरी नवे चिन्ह ठाकरेंच्या उमेदवारांच्या प्रचारात आणि बॅनरवर दिसू लागले आहे.