जालना - मध्यरात्री सुमारे २ वाजता भाजपा नेते राधाकृष्ण विखे यांनी मनोज जरांगे यांची अंतरावली सराटीत भेट घेतली. या दोघांमध्ये तासभर चर्चा झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याचा तपशील मात्र गुलदस्त्यात असल्याचे सांगितले जात आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून (Manoj Jarange) मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत का, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात असल्याचे म्हटले जात आहे. राधाकृष्ण विखे यांनी घेतलेल्या भेटीबाबत मनोज जरांगे यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, आता चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचे, निर्णय घेता येत नाही. ज्यावेळी करायचे होते तेव्हा केले नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच (Devendra Fadnavis) (देवेंद्र फडणवीस) भरकटला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.दरम्यान, आम्हाला शेतकरी, मुस्लीम, गोरगरिब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे. सर्व समाज आपल्यासोबत आहे, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत लढायचे की पाडायचे, याचा अंतिम निर्णय समाजाला विचारून घेतला जाणार आहे. त्यासाठी २० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वाजेदरम्यान राज्यातील मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक होणार आहे.