बीड दि. १५ ( प्रतिनिधी ) : राज्यपाल नियुक्त सदस्यांमधून विधानपरिषदेवर जाण्याचे स्वप्न भंगल्यानंतर आता परळी मतदारसंघात माजी आ. संजय दौंड यांची भूमिका नेमकी काय असणार याचीच उत्सुकता सर्वांना आहे. परळी मतदारसंघात दौंड कुटुंब तसे मुंडेंचे परंपरागत राजकीय विरोधक मानले जाते. अगदी दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनाही पंडितराव दौंड यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता . मध्यंतरी शरद पवारांनी संजय दौंड यांना आमदार केले होते, ते देखील धनंजय मुंडे यांच्याकडील सत्तेचा समतोल साधला जावा म्हणूनच, आता अजित पवार आणि धनंजय मुंडे आपल्याला आमदार करतील हे स्वप्न भंगल्यानंतर संजय दौंड परळीत काय भूमिका घेतात यावर या मतदारसंघातील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.
परळी मतदारसंघात संजय दौंड यांची भूमिका काही जिल्हापरिषद गटांमध्ये महत्वाची असणार आहे. त्यामुळेच संजय दौंड आपल्या बाजूने राहावेत यासाठी मंत्री धनंजय मुंडे प्रयत्नशील दिसत होते. संजय दौंड यांना राज्य विधानपरिषदेवर पाठवायचा शब्द देखील देण्यात आला होता अशी माहिती आहे. स्वतः अजित पवारांनी देखील असा शब्द दिला होता असेही सांगितले जाते. परळीच्या राजकारणात दौंड कुटुंब विरोधात असणे मुंडेंना परवडणारे नाही, त्यामुळेच अगोदर संजय दौंड यांचे पुनर्वसन केले जाईल असे अपेक्षित होते. मात्र सध्या तरी ते शक्य नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या पहिल्या यादीत संजय दौंड यांना स्थान मिळालेले नाही आणि आता पुढे काय होईल हे सांगणे अवघड आहे, त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून भ्रमनिरास झालेले संजय दौंड निमूटपणे हा अपेक्षाभंग सहन करतात का वेगळी भूमिका घेतात याकडे परळी मतदारसंघाचे लक्ष असेल.
मध्यंतरी केंद्र सरकारच्या कृषी उपसमितीवर जिल्ह्यातील तिघांची निवड झाली त्यावेळी त्या तिघांचा सत्कार करताना मुंडे बहीण भावासोबत संजय दौंड दिसले होते. मात्र तेव्हा राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी समोर यायची होती, कसेही करून आमदार व्हायचे ही संजय दौंड यांची इच्छा लपून राहिलेली नाही , त्यामुळे आता ते करणार तरी काय हा प्रश्न आहे.