Advertisement

 तुतारी चिन्हाबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

प्रजापत्र | Tuesday, 15/10/2024
बातमी शेअर करा

मुंबई- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे. दिल्लीतील विज्ञान भवन येथे केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना निवडणुकीसंदर्भात प्रश्न विचारण्यात आले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पिपाणी आणि तुतारी या दोन चिन्हांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला फटका बसला होता. यावेळी हा गोंधळ टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने काय खबरदारी घेतली? असा प्रश्न विचारण्यात आला.

 

 

आयुक्त राजीव कुमार यावर म्हणाले, या प्रकरणात आमच्याकडे दोन विनंत्या आल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने विनंती केल्याप्रमाणे त्यांना पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर चिन्ह दिले गेले पाहीजे. तसेच त्यांचे चिन्ह मतदान यंत्रावर छोटे दाखविले जात आहे आणि पिपाणी चिन्हाला हटवावे, अशीही विनंती त्यांनी केली होती. आम्ही त्यांची पहिली विनंती मान्य केली होती. त्यांना पक्ष म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे.

 

 

पिपाणी चिन्ह हटविणार नाही
तसेच तुतारी वाजविणाऱ्या माणसाला मतदान यंत्रावर कशापद्धतीने दाखवले गेले पाहीजे, हे तुम्हीच आम्हाला सांगा, अशी सूचना केल्याचे राजीव कुमार यांनी सांगितले. त्याप्रमाणे राष्ट्रवादी कडून आम्हाला ज्यापद्धतीचे चिन्ह दिले गेले आहे, ते आम्ही मान्य केले आहे. यावेळी त्यांचे चिन्ह आकाराने मोठे दाखवले जाईल. तसेच पिपाणी चिन्ह आणि तुतारी वाजविणारा माणूस यांचा एकमेकांशी काहीच संबंध नाही, त्यामुळे पिपाणी चिन्ह हटवले जाणार नाही, असेही राजीव कुमार यांनी जाहीर केले.

Advertisement

Advertisement