मुंबई - एसटी महामंडळाकडून दर वर्षी दिवाळीत १० टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र, प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यंदा देखील २५ ऑक्टोबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची भाडेवाढ लागू केली होती. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.
दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मात्र, या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु, आता एसटीच्या तिकीटाचे दर ‘जैसे थे’ अवस्थेत राहतील.