मुंबई- परतीच्या पावसाने महाराष्ट्राला अक्षरश: झोडपून काढलं. मुंबई, पुणे ठाण्यासह पालघर आणि कोकणात गुरुवारी (ता. १०) जोरदार पाऊस झाला. मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यातही पावसाच्या सरी बरसल्या. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. दुसरीकडे पावसाने दांडिया आणि गरब्याचा देखील खेळ बिघडवला. दरम्यान, हवामान खात्याने आजही राज्यभरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी वारे, विजांसह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज जोरदार पाऊस होणार आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस हजेरी लावणार आहे. त्यामुळे या विभागाला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातही परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.