लातूर दि.१० (प्रतिनिधी) - राज्यभरात शेतकऱ्यांची व्होटबँक तयार करून राजकारण्यांना धडा शिकवू. सोयाबीन, कापसाचे धोरण कोण आणेल, त्याबाबत आश्वासन कोण देईल यावर आमच्याशी कोण चर्चा करणार, निवडणुकीपुरता आमचा वापर होऊ देणार नाही. जो दिर्घकालीन धोरण आणण्याचं काम करेल, सकारात्मक चर्चा करेल तेव्हा आम्ही शेतकरी मिळून पुढचा निर्णय घेऊ असं विधान उद्धव ठाकरेंच्या भेटीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिले आहे.
रविकांत तुपकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मला बोलावलं होतं, त्यांनी चर्चेला दिलेल्या निमंत्रणावरून मी गेलो होतो. आम्ही २५ जागांवर शेतकऱ्यांच्या तरूण पोरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवतोय. जे शेतकऱ्यांसाठी लढतात, भांडतात. पण त्यांनी सांगितले, २५ जागांवर तुम्ही लढण्यापेक्षा आमच्यासोबत या...पण आम्हाला मुद्द्यांमध्ये रस आहे. सोयाबीन, कापसाच्या प्रश्नावर जो कोणता पक्ष चांगले धोरण आणेल, जो कुणी आश्वासन देईल आम्ही त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेऊ. अजून कुठलाही निर्णय झाला नाही. ती प्राथमिक चर्चा झाली. त्यांच्या निमंत्रणावरून आम्ही चर्चेला गेलो होतो. आमच्या प्रभावशाली जागा आहेत, जिथे निर्णायक मते आमच्याकडे आहे. शेतकऱ्यांची ताकद जोपर्यंत राजकीय होत नाही तोपर्यंत या लोकांना कळणार नाही असं त्यांनी सांगितले.