Advertisement

 हरियानात भाजपनं तिसऱ्यांदा रोवला झेंडा!

प्रजापत्र | Tuesday, 08/10/2024
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : हरयाणा विधानसभा निवडणुकीचे कल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. पण एक्झिट पोलनं दाखवलेले अंदाज सपशेल फेल ठरले आहेत, कारण भाजपनं पुन्हा एकदा मुसंडी मारली असून तिसऱ्यांना आपला झेंडा या राज्यात रोवला आहे. भाजप सध्या ५० जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस ३५ जागांवर आघाडीवर आहे.

 

 

९० जागा असलेल्या हरियानात बहुमतासाठी ४६ जागा मिळणं आवश्यक असताना भाजपनं त्याही पुढे मजल मारली आहे. पण भाजपच्या या हॅट्रिकसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्या तरी एका व्यक्तीचा विशेष उल्लेख करावा लागणार आहे.मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री असलेले धर्मेंद्र प्रधान यांनी हरियाना निवडणुकीत भाजपला सलग तिसऱ्यांदा जिंकून देण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. मोदींचे 'उज्जवल मॅन' म्हणूनही त्यांची ओळख आहे. प्रधान यांनी ओडिशा विधानसभा निवडणुकीसाठी यशस्वी प्रचार कार्यक्रम आखला होता. लोकसभेसोबत झालेल्या या निवडणुकीत भाजपनं दणदणीत विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली होती.  

 

 

 

धर्मेंद्र प्रधान यांनी हरियानाच्या निवडणुकीत भाजपसाठी चांगली निवडणूक रणनिती आखली होती. तेच दररोज प्रचाराची यंत्रणा हाताळत होते. त्याचबरोबर हरयाणासाठी त्यांनीच भाजपचा जाहीरनामा देखील तयार केला होता. हरियानात विद्यमान भाजप सरकारच्याविरोधात मोठी अँटिइन्कम्बन्सी होती.

त्यामुळं जवळपास सर्वच राजकीय पंडितांनी भाजपला यंदा पराभव होणार असल्याची भाकीतं केली होती. त्यात एक्झिट पोल्सही होते. अँटिइन्कम्बन्सीचा फटका बसू नये म्हणून प्रधान यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांना इथं तिकीटं नाकारली होती. तसंच कमी प्रसिद्धीच्या झोतात असलेल्या नेत्यांना संधी दिली होती.
भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल विज यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला होता. तेव्हा प्रधान यांनी त्यांना चांगलंच फटकारलं होतं, तसंच भाजपचे विद्यमान मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांच्या नेतृत्वावर पक्षाचा पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं होतं.

Advertisement

Advertisement