मुंबई दि. ७ ( प्रतिनिधी) : सत्ता असतानाही आपली कामे झाली नसल्याचे सांगत विधानसभा निवडणूकच न लढविण्याची घोषणा करुन गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी खळबळ उडवून दिली होती. तेच आ. लक्ष्मण पवार आज महाविकास आघाडीच्या मुंबईतील बैठकीच्या ठिकाणी दिसले आहेत. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
मुंबईच्या हॉटेल ट्रायडेंट येथे महाविकास आघाडीची जागा वाटपाची बैठक सुरु आहे. आज या बैठकीसाठी माजी मंत्री राजेश टोपे आले होते. यावेळी त्यांच्या समवेत गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार हे देखील बैठकीच्या स्थळी दिसले. ते तेथे नेमके कशासाठी आले किंवा त्यांच्या आणि टोपेंच्या भेटीचे रहस्य काय हे मात्र समोर आलेले नाही.
लक्ष्मण पवार हे गेवराईचे भाजप आमदार आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर टिका करत विधानसभा निवडणूक न लढविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहावरून कार्यकर्ता मेळावा घेऊन निर्णय घेऊ असे आ. पवार म्हणाले होते. मात्र तो मेळावा देखील नंतर रद्द करण्यात आला. आ. लक्ष्मण पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या बैठकस्थळी आ. लक्ष्मण पवारांच्या राजेश टोपेंसोबत दिसण्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
प्रजापत्र | Monday, 07/10/2024
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा