Advertisement

कब्रस्थान अतिक्रमण प्रकरणी गेवराईच्या तहसीलसमोर आंदोलन

प्रजापत्र | Tuesday, 10/09/2024
बातमी शेअर करा

गेवराई दि.१० (प्रतिनिधी)- तालुक्यातील तलवाडा येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झालेले आहे. या संदर्भात बीड जिल्हाधिकारी आणि राज्य वक्फ बोर्डने आदेश देऊनही गेवराईचे तहसील प्रशासन कार्यवाही करत नसल्यामुळे संतप्त झालेल्या तलवाडा येथील सकल मुस्लिम समाजाने आज गाव बंद ठेवून गेवराई तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मयत् व्यक्तीला घेऊन जाण्याची डोली तहसील कार्यालयाच्या दारात आणून ठेवण्यात आली असून अख्खं गाव कुटुंबासह उपोषणाला बसले आहे.  

 

तलवाडा येथील मुस्लिम कब्रस्तान हे निजामकालीन कब्रस्तान असून त्यावर हजारो वर्षापासून मुस्लिम समाजाच्या पूर्वजांचे दफनविधी करण्यात आलेले आहे. मात्र त्याच जागेवर काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. हे अतिक्रमण काढण्यासाठी सकल मुस्लिम समाज बांधव गेल्या चार वर्षांपासून कायदेशीर लोकशाही मार्गाने लढा लढत आहे पण तहसीलदार हे वक्फ बोर्डाच्या व जिल्हाधिकारी यांच्या तलवाडा येथील कब्रस्तानवरील अतिक्रमण हटवण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवली. यासंदर्भात शासन व प्रशासन यांनी या बेमुदत उपोषणाला बसलेल्या मुस्लिम बंधु भगिनींना जर न्याय नाही दिला तर लवकरच महाराष्ट्रभर आंदोलन करण्यात येईल याची प्रशासनाने दखल घ्यावी असा ईशारा देण्यात आला आहे. या सकल मुस्लिम समाज बांधवांच्या बेमुदत उपोषणास लहुजी साळवे बहुजन क्रांतीसेनेसह विविध राजकीय, सामाजिक संघटनांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

Advertisement

Advertisement