Advertisement

पीएम किसानचा २२ वा हप्ता कधी येणार?

प्रजापत्र | Thursday, 26/02/2026
बातमी शेअर करा

दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM KISAN) योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. आवश्यक कागदपत्रे, ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया वेळेत पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना हप्ता मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही. हप्त्याची रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल.मात्र, यावेळी सरकारने मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची पुनर्तपासणी केली आहे. जमीन नोंदींची पडताळणी, ई-केवायसी आणि पात्रतेचे निकष तपासल्यानंतर काही नावे यादीतून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही केंद्र सरकारची महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २,००० रुपये अशी आर्थिक मदत दिली जाते. वर्षभरात एकूण 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. ही योजना २०१८ मध्ये सुरू झाली असून आतापर्यंत २१ हप्ते वितरित करण्यात आले आहेत. २१ वा हप्ता १९ नोव्हेंबर २०२५ रोजी देण्यात आला होता.२२ व्या हप्त्यापूर्वी सरकारने पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि पात्र लाभार्थ्यांनाच लाभ मिळावा यासाठी तपासणी मोहीम राबवली आहे. पहिला निकष म्हणजे जमीन नोंदींची पडताळणी. १ फेब्रुवारी २०१९ नंतर नावावर जमीन नोंदवलेल्या प्रकरणांची तपासणी होत आहे. जमीन मालकी हा या योजनेचा प्रमुख निकष असल्याने नोंदीत विसंगती आढळल्यास लाभार्थ्याचे नाव वगळले जाऊ शकते.दुसरा निकष म्हणजे “एका कुटुंबातून एकच लाभार्थी” हा नियम. पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले यांना एक कुटुंब मानले जाते. जर एका कुटुंबातील दोघेही हप्ता घेत असल्याचे आढळले, तर त्यातील एकाचा लाभ थांबवण्यात येत आहे.

पात्र लाभार्थी यादी कशी तपासावी?
लाभार्थी आपले नाव तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊ शकतात.
होमपेजवर ‘Know Your Status’ या पर्यायावर क्लिक करावे. यानंतर कॅप्चा कोड आणि नोंदणी क्रमांक टाकून माहिती पाहता येते. माहिती अपडेट करण्यासाठीही वेबसाइटवर स्वतंत्र पर्याय उपलब्ध आहे.

२२ वा हप्ता कधी मिळणार?
केंद्र सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, 22 वा हप्ता या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. एकूणच, यावेळी हप्ता मिळण्यापूर्वी लाभार्थ्यांनी आपली पात्रता, जमीन नोंदी आणि ई-केवायसीची स्थिती तपासून घेणे गरजेचे आहे.

Advertisement

Advertisement