सोहळे धार्मिक असतील किंवा अध्यात्मिक, सत्संग असेल किंवा कुंभमेळा, कीर्तन असेल किंवा आणखी काही, अगदी हज यात्रा असेल किंवा आणखी एखादे धार्मिक आयोजन, मनुष्य त्या ठिकाणी जातो ते समाधान शोधण्यासाठी, आत्मिक शांतीसाठी, मात्र अशा ठिकाणीच जर मृत्यु त्याची वाट पाहत उभा असेल आणि ते देखील आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे, तर इतक्या साऱ्या मृत्युंची जबाबदारी टाकायची कोणाच्या शिरावर? धार्मिक, आध्यत्मिक आयोजनाच्या ठिकाणावरचे भय संपणार आहे तरी कधी? हाथरस दुर्घटनेने असे अनेक प्रश्न नव्याने समोर आणले आहेत. आणि ते व्यवस्थेला विचारावे लागणार आहेत. धार्मिक आयोजनाच्या बाबतीतच प्रश्न का असला उपटसुंभी युक्तिवाद होऊ शकतो हे गृहीत धरून देखील संत तुकारामांनीच सांगितल्या प्रमाणे 'काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले' ची परिस्थिती आज आहे.
उत्तरप्रदेशातील हाथरस येथील भोलेबाबाच्या सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत १०० पेक्षा अधिक जणांचा झालेला मृत्यु हृदय पिळवटून टाकणारा आहेच, पण त्यासोबतच, ज्यांनी या सत्संगाचे आयोजन केले होते, तो भोलेबाबा, आयोजनस्थळी प्रेतांचा खच पडला असतांना चक्क फरार होतो हे अधिक चीड आणणारे आहे. एरव्ही उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुशासनाच्या मोठ्या गप्पा मारीत असतात, मात्र कदाचित कथित भोलेबाबा धार्मिकतेचा बुरखा पांघरून वावरत असल्याने योगींचें सुशासन त्याला शासन करायला कचरत असेल. या भोलेबाबाच्या इतिहासात जाण्यात फारसे काही हशील नाहीच, बहुतांश बाबांचा इतिहास जसा काळवंडलेला असतो तसाच भोलेबाबाचाही, उत्तरप्रदेश पोलिसातून बडतर्फ केलेला हा व्यक्ती अचानक बाबा होतो आणि त्याचे लाखोंचे सत्संग सुरु होतात, हे कोणत्याच सरकारला दिसत नाही असे कसे म्हणता येईल? इतरांना शांती, समाधान आणि आशीर्वाद देण्याची भाषा करणारा हा बाबा, आपल्या आयोजनस्थळी प्रेतांचा खच पडल्यानंतर मयताच्या नातेवाईकांचे अश्रू पुसायला देखील थांबत नाही, हे आपल्या समाजव्यवस्थेचे कठोर वास्तव आहे.
प्रश्न एकट्या हाथरस किंवा भोलेबाबाचा नाही, प्रश्न आहे तो आपल्या सामाजिक मानसिकतेचा. आतापर्यंत देशात धार्मिक स्थळे किंवा धार्मिक आयोजनाच्या ठिकाणी मोठमोठे अपघात घडले आहेत, मात्र आपण त्यातून काही शिकतो का, हा प्रश्न आहेच. हे केवळ भारतात घडते असे नाही, अगदी सौदी अरेबियामध्ये हज यात्रेच्या दरम्यान चेंगराचेंगरी होण्याचे आणि त्यात भाविकांचा मृत्यु होण्याचे प्रमाण घडलेले आहेतच, पण भारतातील धर्मस्थळांमध्ये हे प्रमाण तुलनेने अधिक आहे, आणि त्याचा विचार गांभीर्याने करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्रातील मांढरदेवी येथे २००५ मध्ये घडलेल्या दुर्घटनेत गेलेले ३४० बळी असतील किंवा नाशिक, अलाहाबाद येथील कुंभमेळ्यांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये प्राण गमवावे लागलेले अनेक जण असतील, २००८ मधली राजस्थानच्या चामुंडा देवी मंदिरातील दुर्घटना असेल किंवा २०११ मधली शबरीमला मंदिरातील चेंगराचेंगरी, अगदी मागच्या वर्षी रामनवमी महोत्सवा दरम्यान इंदोरमध्ये झालेली घटना, धार्मिक यात्रा आणि आयोजनांमध्ये आपल्याकडे नियोजनाचा कसा अभाव असतो आणि त्याची किंमत सामान्यांना आपल्या प्राणांनी कशी चुकवावी लागते, हे दर एक दोन वर्षांनी देशात कोठे ना कोठे तरी समोर येत असतेच. उत्तराखंडमध्ये झालेली ढगफुटी असेल किंवा मांढरादेवीची घटना, त्या ठिकाणी किमान नैसर्गिक आपत्ती तरी आली होती, मात्र इतर अनेक ठिकाणी केवळ आयोजक गर्दीचे व्यवस्थित नियोजन करीत नाहीत, गर्दी जमविण्याचा अट्टाहास करतांना, त्या गर्दीला पुरेशी जागा आहे का? याचा विचार केला जात नाही, आणि अशा आयोजनांना परवानगी देताना, प्रशासन देखील यातली कोणतीच गोष्ट पाहात नाही . मुळातच कोणाच्या पायाखालची माती घ्यायला जाणे संयुक्तिक आहे का नाही, यावर भाष्य करणे अवघड आहे, हा शेवटी ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा आणि विवेकाचा देखील प्रश्न आहेच, आज लोक स्वतःला इतके असुरक्षित समजत आहेत की त्यावरचा उपाय म्हणून ते कोठे गर्दी करतील हे सांगता येणे अवघड आहे.
पुन्हा काही बोलायला जावे तर आमच्या धर्मश्रद्धांच्या आड येऊ नका म्हणून ओरडा करायला कथित धर्मरक्षक आहेतच. पण ज्यावेळी अशा काही घटनांनी काही निष्पाप लोकांना जीव गमवावा लागतो, त्यावेळी कोणीतीरी बोलावेच लागते. संत तुकारामांनीही 'बुडती हे जन, देखवे न डोळा, म्हणून कळवळा येतसे' असे सांगितले आहेच आणि त्यांनीच 'काय करू आता धरूनिया भीड, निःशंक हे तोंड वाजविले' म्हणत ज्यांना आवाज नाही, त्यांचा मूकनायक होण्याची शिकवण दिलेली आहे, म्हणूनच अशा सर्वच धार्मिक आयोजनांबाबत कठोर नियम असण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. धार्मिक, अध्यात्मिक किंवा अगदी राजकीय आयोजनाच्या ठिकाणी देखील मानवी चुकांमुळे काही दुर्घटना घडली तर त्याची जबाबदारी आयोजकांवर निश्चित केली पाहिजे आणि त्यांना कठोर शिक्षा देखील झाली पाहिजे. अशा मोठमोठ्या आयोजनाच्या ठिकाणी सुरक्षेचे किमान उपाय योजले आहेत का हे न पाहताच, ज्या परवानग्यांच्या पायघड्या घातल्या जातात, त्यावरही कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याशिवाय इथले भय संपणार नाहीच.