Advertisement

 अखेर जिल्हापरिषदेसाठी अंतिम  गट रचना जाहीर

प्रजापत्र | Friday, 22/08/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. २२ (प्रतिनिधी ) : बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर बीड जिल्हापरिषदेच्या ६१ गटांची आणि जिल्ह्यातील ११ पंचायत समित्यांमधील १२२ गणांसाठीची अंतिम रचना जाहीर केली आहे. यासाठी १४ जुलै रोजी प्रारूप प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यावरील  आक्षेप आणि हरकतींवर सुनावणी झाल्यानंतर आता अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अंतिम प्रभाग रचनेत केज तालुक्यात मोठ्याप्रमाणावर बदल झाले आहेत.
    राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भाने ग्रामविकास विभागाने बीड जिल्हा परिषदेसाठी ६१ इतकी सदस्यसंख्या निश्चित केली होती, त्यानुसार गट गण रचना करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यासाठीची प्रारूप प्रभाग रचना १४ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर बीड जिल्ह्यातून मोठ्याप्रमाणावर हरकती घेण्यात आल्या होत्या. जिल्हापरिषद आणि पंचायत समितीसाठी दाखल करण्यात आलेल्या सुमारे ६६ हरकतींवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्यासमोर सुनावणी झाली. या सुनावणीत केज तालुक्यातील काही हरकती स्वीकारण्यात आल्या. त्यानुसार आता नव्याने प्रभाग रचना करून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 

केज तालुक्यात झाले हे बदल 
२०१७ च्या निवडणुकीत केज तालुक्यात जिल्हापरिषदेचे ६ गट आणि पंचायत समितीचे १२गण होते , आता आगामी निवडणुकीसाठी केज तालुक्यात जिल्हापरिषदेचे ७ गट आणि पंचायत समितीचे १४  गण करण्यात आले आहेत. त्यासाठीच्या प्रारूप प्रभाग  रचनेवरील आक्षेपानंतर आता आडस गटातील तांबवा गणात  भाटुंबा गावाचा समावेश करण्यात आला आहे. तर या गणातील प्रस्तावित ढाकेफळ गाव अंतिम प्रभाग रचनेत आडस गटातून वगळण्यात आले आहे. होळ जिल्हापरिषद गटातील होळ गणामध्ये सावळेश्वर  हे गाव नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. तर युसुफवडगाव या गटामधून भाटुंबा आणि सावळेश्वर ही गावे वगळून त्या गटात ढाकेफळ हे गाव समाविष्ट करण्यात आले आहे. या रचनेचा  सामाजिक आरक्षणावर देखील परिणाम होणार आहे. 

 

Advertisement

Advertisement