Advertisement

भाजपची अपरिहार्यता आणि पंकजा मुंडेंना पुन्हा झेप घेण्याची संधी

प्रजापत्र | Tuesday, 02/07/2024
बातमी शेअर करा

संजय मालाणी- बीड दि. १ : लोकसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका, राज्यात मराठा ओबीसी आंदोलनाचे उमटत असलेले पडसाद आणि आगामी काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुका, यामुळे भाजपला पक्षांतर्गत वाद मिटवून संघटनेत एकवाक्यता आणणे आवश्यक होतेच, त्यासोबतच ज्यांच्या सोबत जनमानस आहे अशा ओबीसी नेत्यांना सक्रिय करणे देखील आवश्यक होतेच. पक्षाची ही अपरिहार्यता देवेंद्र फडणवीस यांना देखील माहित आहे, आणि या अपरिहार्यतेतूनच भाजपला उशीराने का होईना, पण पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन करावे लागलॆ आहे. प्रदेश भाजपमधील संघटनात्मक बदलांची ही सुरुवात आहे. त्यासोबतच भाजपची ही राजकीय अपरिहार्यता पंकजा मुंडेंसाठी मात्र पुन्हा एकदा राजकीय पटलावर झेप घेण्यासाठी संधी आहे. त्या त्याचे किती सोने करु शकतील यावर भविष्यातील बरीच राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. महाराष्ट्र भाजपमधील मोठे नेते असलेल्या गोपीनाथ मुंडेंचे २०१४ मध्ये अचानक निधन झाले आणि प्रदेश भाजपमधील सत्तेची सारी समीकरणेच बदलली. तसे तर २०१४ पूर्वीच प्रदेश भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे एक आक्रमक चेहरा म्हणून पुढे येत होतेच, गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी त्यांनी भरून काढली आणि ते राज्य भाजपचा चेहरा झाले. मागच्या दहा वर्षाच्या काळात तर फडणवीस म्हणजे महाराष्ट्र भाजप आणि महाराष्ट्र भाजप म्हणजे फडणवीस असे जणू सूत्रच झाले होते. राजकारणातील वाटा, आडवाटांची खडानखडा माहिती, सत्तेसाठी कोणतेही डावपेच खेळण्याची आणि कोणताही डाव टाकण्याची तयारी आणि केंद्रीय नेत्यांचा आशीर्वाद यामुळे फडणवीस म्हणतील तसेच राज्यात घडू लागले. हे होत असताना मग फडणवीसांनी आपल्याला स्पर्धक ठरू शकतील अशा राज्यातील नेत्यांना शह देणे सुरु केले. त्याचा फटका एकनाथ खडसेंपासून विनोद तावडेंसह दिवंगत गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे यांना देखील बसला. अर्थात याला काही प्रमाणात ते ते नेतेही जबाबदार होतेच.

 

 

 

 

राजकारणात वारे पाहून काही निर्णय घ्यावे लागतात, ते कदाचित पंकजा मुंडेंना जमले नाही आणि राज्यात पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस एकाच पक्षात असूनही एकमेकांचे विरोधक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातच २०१९ च्या निवडणुकीत परळी मतदारसंघात पंकजा मुंडेंचा त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्याकडूनच पराभव झाला आणि पंकजच्या राजकीय विजनवासाला सुरुवात झाली. राज्याची सूत्रे फडणवीसांच्या हाती, पद मिळाले नाही तरी हरकत नाही,पण मी कोणाकडे काही मागायला जाणार नाही अशी पंकजा मुंडेंची भूमिका आणि फडणवीसांना थेट मोदींचे आशीर्वाद असल्याने त्यांना पंकजा मुंडे यांना राजकीय शह देण्यामुळे मागच्या साडेचार वर्षात पंकजा मुंडेंना राजकीय वनवासाचे चटके सोसावे लागले. त्याहीपलीकडे जाऊन पक्षाने कधी भागवत कराड तर कधी कधी रमेश कराड यांच्या माध्यमातून पंकजा मुंडेंची हक्काची मतपेढी वळविता येते का हे देखील करून पाहिले, पण हे दोन्ही कराड तसे भाजपसाठी उपयोगी ठरले नाहीत. राजकारणात कोणतीच परिस्थिती कधीच कायम राहत नसते. तेच देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत घडले. दिल्लीतल्या काही नेत्यांना फडणवीस आपले स्पर्धक वाटू लागले आणि मग तेथूनच मागच्या काही महिन्यात पक्षाची धोरणे बदलायला लागली. केंद्रीय पातळीवरून अनेक निर्णय फडणवीसांना विश्वासात न घेता घेतले गेले . लोकसभा निवडणुकीत देखील त्यांना फारसा व्हॉइस नव्हता. लोकसभेच्या निकालांनी तर भाजपला धक्काच दिला. महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसला आणि आता राज्य राखायचे तर काही तरी वेगळे करावे लागेल याचा विचार पक्षाला करावा लागला. राज्यात सध्या मराठा विरुद्ध ओबीसी वाद सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत दलित आणि मुस्लिम समाज भाजपविरोधात एकवटल्याचे चित्र दिसले, त्याचे परिणाम देखील दिसले. आता सहाच महिन्यात हे चित्र फारसे बदलेल अशी परिस्थिती नाही, त्यामुळे आता ओबीसी समूह तरी आपल्यासोबत असणे आवश्यक असल्याची जाणीव भाजपला झाली आणि त्या अपरिहार्यतेतूनच पंकजा मुंडेंचे राजकीय पुनर्वसन होत आहे. पंकजा मुंडे या ओबीसींच्या नेत्या आहेत. दिवंगत गोपीनाथ मुंडेंची कन्या असणे हे त्यांचे फार मोठे बलस्थान आहे. भलेही त्यांना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत पराभवाचे तोंड पाहावे लागले असेल, मात्र पंकजा मुंडेंचा प्रभाव राज्यातील अनेक मतदारसंघात आहे. त्यांची मतपेढी सुमारे ४० मतदारसंघात निर्णायक आहे आणि म्हणूनच पंकजा मुंडे भाजपसोबत केवळ असणे नाही, तर त्या पक्षात सक्रिय असणे भाजपसाठी महत्वाचे आहे. त्यांना विधानपरिषदेवर घेण्यामागे हेच समीकरण आहे. आणि आता साडेचार वर्षाहून अधिक काळाचा राजकीय वनवास भोगल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय पटलावर झेप घेण्याची, स्वतःची क्षमता आणि उपयुक्तता दाखविण्याची, किंबहुना स्वतःला सिद्ध करण्याची संधी पंकजा मुंडेंना मिळत आहे. पंकजा मुंडेंना राजकारणाबद्दल कोणी काही सांगण्याची आवश्यकता नाही, किंबहुना त्यांना ते आवडणारही नाही, मात्र साडेचार वर्षांच्या अनुभवांनीच त्यांना खूप काही शिकायला मिळाले आहे, त्यातून त्या तावून सुलाखून निघाल्या असतील आणि मिळालेल्या संधीचे सोने करतील अशी अपेक्षा.

 

Advertisement

Advertisement