Advertisement

संपादकीय अग्रलेख - 'बौद्धिक' पचेल का ?

प्रजापत्र | Thursday, 20/06/2024
बातमी शेअर करा

भाजपवाले भलेही राष्ट्र प्रथम आणि व्यक्ती सर्वात शेवटी असे आपले तत्वज्ञान असल्याचे सांगत असतील,मात्र मागच्या काही काळात भाजपमध्ये व्यक्तिस्तोम मोठ्याप्रमाणावर माजले आहे हे वास्तव आहे. अगदी केंद्रातले सरकार भाजपचे असण्यापेक्षा जेव्हा मोदी सरकार होते, किँवा लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या अभिवचनापेक्षा 'मोदी की गॅरंटी ' अधिक चर्चेत असते, त्यावेळी राज्यांमध्ये देखील व्यक्तिकेंद्री राजकारण झाल्याशिवाय कसे राहील, महाराष्ट्रात तेच घडत गेले. अर्थात त्याचा फटका बसल्यानंतर आता भाजपला उपरती झाली आहे. 'कोना एकाच्या सांगण्यावर पक्ष चालणार नाही ' हे बौद्धिक भाजपच्या दिल्लीश्वरांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना पाजले आहे, मात्र मागच्या काही काळात पक्षाच्या नेत्यांना जी सवय लागली आहे ते पाहता आता असले काही या नेत्यांना पचणार आहे का ?
 

राजधानी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वासोबत महाराष्ट्रातील कोअर कमिटीची बैठक पार पडली. त्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जो काही निकाल आला, त्याच्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत कुठे आणि कशी मतं मिळाली,  कुठे चांगले यश मिळालं, कुठे कमी मतं मिळाली? त्याची कारण काय काय होती? निवडणुकीत कोण कोणत्या मुद्द्यांचा इम्पॅक्ट होता,  अशा सगळ्या गोष्टींची चर्चा या बैठकीत झाली. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत एकट्या भाजपचा विचार केला तर त्यांच्या १३ जागा कमी झाल्या आहेत . त्यामुळे भाजपसाठी महाराष्ट्रात तशी ही धोक्याची घंटा . त्यामुळेच या बैठकीत त्याची साधक बाधक चर्चा होणे अपेक्षित होतेच, चार महिन्यात महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे लोकसभेला नेमके काय चुकले याचे मंथन होणे अपेक्षित होते, तसे झाले. आणि महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीला दिल्लीश्वरांनी ' सर्वांना विश्वासात घेऊन काम करा , कोणा एकाच्या म्हणण्यानुसार पक्ष चालणार नाही ' असे सुनावले आहे.

 

मुळात भाजपमध्ये अगदी काही दशकांपूर्वीपर्यंत व्यक्तिस्तोम माजविले जात नव्हते. त्यावेळी भाजपची ओळख 'पार्टी विथ डिफरन्स ' अशी होती.अगदी अटलबिहारी वाजपेयींच्या वेळी भलेही निवडणुकीतील घोषणा 'राजतिलक की करो तय्यारी , आ रहे है अटल बिहारी ' अशी असेल पण ज्यावेळी सरकार स्थापन झाले त्यावेळी ते सरकार रालोआचे म्हणूनच ओळखले गेले. ते एका व्यक्तीभोवती फिरले नाही. मात्र आता तो काळ राहिलेला नाही. भाजपचा चेहरा मोहरा बदलला आहे. भाजपच्या अध्यक्षपदावर कोणी का असेना , भाजपची ओळख आणि चेहरा केवळ आणि केवळ मोदी कसा राहील हेच मागच्या काळात जाणीवपूर्वक पहिले गेले. आणि त्याचीच री मग राज्यांनी ओढली. महाराष्ट्रात मागच्या दशकभरात महाराष्ट्र भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच राज्य भाजप असेच चित्र निर्माण केले गेले. देवेंद्र फडणवीस हे थेट मोदींचे लाडके, त्यामुळे मग महाराष्ट्र भाजपात ' आले देवेंद्रांच्या मना , तेथे कोणाचे चालेना ' असेच चित्र होते.त्यामुळे मग ज्यांच्यावर देवेंद्रांची खप्पा मर्जी , त्यांच्या नशिबी राजकीय वनवास असे जणू समीकरण झाले. यात मग एकनाथ खडसेंपासून पंकजा मुंडेंपर्यंत अनेकांना याचा अनुभव आला. आणि त्यातूनच मग महाराष्ट्र भाजपात एक प्रकारची अस्वस्थता वाढत गेली.

 

अर्थात फडणवीस भलेही मोदींचे लाडके असतील, पण 'आजका देवेंद्र कलका नरेंद्र ' अशा जर घोषणा होणार असतील तर त्या अमित शहांना रुचणार कशा ? आणि त्यातूनच मग फडणवीसांचे पंख कापण्यासाठी त्यांना शिंदेंच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रीपद घ्यायला भाग पाडणे असेल किंवा त्यांच्या इच्छेविरुद्ध अजित पवारांना सोबत घेण्याचा भाजपचा निर्णय असेल या साऱ्या अंतर्गत गटबाजीचा फटका भाजपला बसला आहे. मागच्या दहा वर्षात भाजपच्या सामान्य कार्यकर्त्याला देखील फडणवीस म्हणजेच भाजप याची सवय झाली आहे, आता अवघ्या काही महिन्यात हे चित्र भाजपला बदलता येणार आहे का ? पक्षाच्या कोअर कमिटीत असणाऱ्या अनेकांचे मागच्या काळात भाजपच्याच अंतर्गत राजकारणामुळे मोठे राजकीय नुकसान झाले आहे, ते भरून काढण्याचा कोणता मार्ग पक्षाकडे आहे, आणि ते झाले नाही , तर नाराजांनी कामाला लागायचे तरी कसे ? त्यामुळे आता ' सबका साथ ' चे बौद्धिक राज्यातील नेत्यांच्या कितपत पचनी पडेल ? 

Advertisement

Advertisement