उद्योग बंद करण्याचा इशारा,राखेच्या वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर कारवाई
बीड -परळी शहर आणि परिसरात राखेमुळे होणारे प्रदूषण हा कळीचा मुद्दा ठरला आहे. या प्रदूषणामुळे परळीकर अस्वस्थ असले तरी सदर प्रदूषण रोखण्यासाठी औष्णिक वीज निर्मिती केंद्राची यंत्रणा कोणत्याही उपाययोजना करीत नसल्याचा ठपका आता खुद्द प्रदूषण नियंत्रण मंडळानेच ठेवला आहे. 'प्रदूषण नियंत्रणात अपयश येत असल्याने आपला उद्योग बंद का करू नये ? 'अशी विचारणा करणारी नोटीस प्रदूषण नियंत्रण मंडळाने थर्मलच्या व्यवस्थापनाला बजावली आहे.
महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनीच्या माध्यमातून परळी येथील औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र चालविल्या जाते. मात्र येथून होणारी राखेची वाहतून पर्यावरणाला आणि मानवी आरोग्याला मोठ्याप्रमाणांवर धोका निर्माण करीत असल्याचे चित्र आहे. परळी शहर आणि परिसरात उघड्या र्कच्या माध्यमातून देखील राखेची वाहतूक केल्या जाते. थर्मलमधून राख उचलणे आणि त्याची वाहतूक करणे यासाठी जे काही पर्यावारांविषयक नियम आहेत, त्याचे देखील पालन केले जात नाही. यासंर्भात परळीमधील नागरिकांनी अनेकदा आंदोलन केलेले आहे.
हेही वाचा
या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाने यापूर्वी अनेकदा परळी येथे भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी कंपनीला पर्यावरण विषयक नियमांचे पालन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र अजूनही राखेची अवैध वाहतूक आणि अवैधरित्या राख उचलण्याचे प्रकार सुरूच असून कंपनीने यासंदर्भात कसलीच पावले उचलली नसल्याचा ठपका प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठेवला आहे.
प्रदूषण नियंत्रण मंडळ औरंगाबादचे प्रादेशिक अधिकारी डॉ. प्रवीण जोशी यांनी यासंदर्भात महाराष्ट्र स्टेट पावर जनरेशन कंपनीला नोटीस दिली असून आपला उद्योग बंद का करण्यात येऊ नये आणि या घटकाचे पाणी आणि वीज पुरवठा खंडित करण्यासंदर्भात संबंधितांना का सांगू नये अशी विचारणा केली आहे.