शिरूर दि.२५ (प्रतिनिधी)- एप्रिल महिन्यातच नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या असून पाणी टंचाईचा सामना करण्याची लढाई सुरू झाली आहे.तालुक्यातील हिंगेवाडी येथील एका महिलेचा विहिरीतील पाणी काढत असताना पायरी वरुन पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.पाणी टंचाईचा सामना करत असताना महिलेचा पहिला बळी गेला असून भविष्यात पाणीप्रश्न किती गंभीर असणार आहे याची जाणीव करून देणारा आहे.हिंगेवाडी येथील चंद्रकला दगडू फुलमाळी (वय ४० वर्षे) रा.हिंगेवाडी या आपल्या पुतण्यासोबत पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेल्या होत्या.या वेळी विहिरीतील तुटलेल्या पायरीवरुन पाय निसटल्याने त्या खाली पडल्या.सदरील प्रकार त्यांचा पुतण्या भरत याने पाहिल्यानंतर तो घराकडे पळत गेला आणि घडलेला प्रकार सांगितला.या वेळी आजूबाजूचे लोक विहिरीकडे पळाले.परंतु तो पर्यंत मृतदेह विहिरीच्या तळाला गेला होता.घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबीयांना धीर दिला आणि मृतदेह पुढील प्रक्रियेसाठी शिरूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविला.
   चौकट                                     
कुटुंबाचा आधारच गेला                        
मयत चंद्रकला दगडु फुलमाळी यांचे पती मानसिकदृष्ट्या आजारी असून संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करण्याची जबाबदारी हि चंद्रकला यांच्यावरच होती.आपला पारंपारिक व्यावसाय सांभाळत त्या कुटुंबाची उपजीविका चालवत होत्या.परंतु या घटनेत त्यांचाच मृत्यु झाल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर आले असून कुटुंबाचा आधारच गेला आहे.                 
   चौकट                               
प्रशासनाचे पाणीप्रश्नाकडे दुर्लक्ष?   
  तालुक्यात पाणीप्रश्न गंभीर बनलेला असताना प्रशासन मात्र निवडणुका आणि बैठकांच्या कामात व्यस्त दिसत आहे.या धावपळीत पाणीप्रश्न किती महत्वाचा आहे आणि त्याला प्राधान्य दिले पाहिजे हे देखील प्रशासन विसरून गेले असल्याचे नागरिक बोलत आहेत.

 
                                    
                                 
                                 
                              


