Advertisement

बंदुकीच्या धाकावर पती-पत्नीचे अपहरण

प्रजापत्र | Tuesday, 06/02/2024
बातमी शेअर करा

माजलगाव - तालुक्यातील घळाटवाडी येथील ऊसतोड मजूर असलेल्या पती-पत्नीसह दोघांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे २ वाजता घडली. यातील दोघांना सोडून दिले असून पती-पत्नी अद्यापही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत.

 

 

घळाटवाडी येथील रहिवासी असलेले संतोष रतन शिंदे यांचा मुलगा सचिन संतोष शिंदे व त्याची पत्नी चंपाबाई सचिन शिंदे हे येडेश्वरी येथील कारखान्याला उसतोडणीसाठी गेले होते. मात्र, मंजुरीचे पैसे मिळाल्याने शिंदे दाम्पत्य काही दिवसांपूर्वी कारखान्याहून परत आले. दरम्यान, मंगळवारी पहाटे २ वाजता दोन जीपमधून काही लोक शिंदे यांच्या घरी आले. घरात घुसून त्यांनी गोळीबार करत बंदुकीच्या धाकावर अनिल संतोष शिंदे, सचिन संतोष शिंदे , चंपाबाई सचिन शिंदे , तायाबाई शिंदे यांना जीपमध्ये टाकले. काहीवेळाने अनिल व तायाबाई यांना त्यांनी रस्त्यातच सोडून दिल्याची माहिती शिंदे यांच्या नातेवाईकांनी दिली आहे. 

 

 

शिंदे दाम्पत्य ताब्यात
सचिन व चंपाबाई शिंदे हे पती-पत्नी अद्यापही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत. या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. हा प्रकार उसतोडीतून झाला असून या ठिकाणी गोळीबार झालेला नाही व त्यांचे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही अशी माहिती  घटनेची माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालक कोळी यांनी दिली आहे. 

Advertisement

Advertisement