Advertisement

संपादकीय अग्रलेख- कायदा आहे, सुव्यवस्थेचे काय ?

प्रजापत्र | Friday, 23/02/2024
बातमी शेअर करा

राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात २१ दिवसात १५ हत्या होतात, ही बाबच राज्यातील कायदा सुव्यवस्थेला पूर्णतःनागडे करणारी आहे. नागपूरचं कशाला, राज्याच्या इतर भागांमध्ये देखील वेगळी परिस्थिती नाही. अगदी शांत म्हणवल्या जाणाऱ्या पुण्यासारख्या शहरामध्ये काय होत आहे? मुंबईत राजकीय कार्यकर्त्यांवरचे हल्ले आहेतच . कोणीही उठावे आणि काहीही करावे, आपल्यावर पोलीस काही कारवाई करतील असा धाकच मुळात राहिलेला नाही. अनेक गुनंदांना राजकीय आशीर्वाद आहेत हे आता उघड गुपित आहे. त्यामुळे गुंडगिरीला राजाश्रय मिळणार असेल तर कायदा कितीही कठोर असला तरी सुव्यवस्था राखली जाणार कशी ?
 

      नागपूर हे तसे सध्या राज्यात नव्हे देशात महत्व आलेले शहर. नागपुरातून देशातील सत्तेची सूत्रे हलतात असे म्हटले तरी तो अतिरेक नक्कीच होणार नाही. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा जिल्हा. नागपूर शहरात २१ दिवसात १५ हत्या झाल्या आहेत. ज्यांच्या हत्या झाल्या त्यातील बरेच लोक कोणत्या ना कोणत्या मार्गाने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रित्या गुन्हेगारी जगताशी संबंधित होते. म्हणूनच हा सारा प्रकार गुन्हेगारीतून घडत आहे हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. राज्याच्या उपराजधानीची अवस्था ही आहे. तर दुसरीकडे राज्याचे चित्र फारसे वेगळे आहे असे म्हणता येत नाही. गावागावात वाढलेली गुंडगिरी इतकी आहे, की सामान्यांना भीती वाटावी असेच चित्र सर्वत्र आहे. पुणे काय, मुंबई काय, छत्रपती संभाजीनगर काय किंवा आणखी कोणतेही शहर किंवा गाव काय, अगदी बीड जिल्ह्यात देखील मागच्या दोन दिवसात दोन मोठ्या टोळ्या पकडण्यात आल्या. म्हणजे पुण्यामुंबईच्या टोळ्या खुलेपणाने राज्याच्या वेगवेगळ्या भागात फिरत आहेत. या टोळ्या पकडल्या गेल्या नसत्या तर त्यांनी काही तरी कांड केले असतेच.
     बरे केवळ गुन्हेगारी जगतात हे सुरु आहे, गुंडांना गुंड पाहून घेत आहेत असे म्हणावे तर तशीही परिस्थिती नाही. पुण्यात निखिल वागळे यांच्या बाबतीत जे काही घडले ते काय होते? आजही जरा कोणी स्पष्ट विचार मांडायचे प्रयत्न केले तर लगेच त्याला धमकावले जाते, सामाजिक, राजकीय विरोधाला मुद्द्याने उत्तर देण्याची परंपरा महाराष्ट्राची होती, पण कोकण काय, मराठवाडा काय किंवा खानदेश विदर्भ काय, सगळीकडेच सध्या गुंडगिरी हेच कोणत्याही प्रश्नावरचे उत्तर ठरून पाहत आहे. म्हणजे कायद्यापेक्षा देखील झुंडशाही आणि गुंडशाही प्रभावी झाली आहे का? असा प्रश्न पुन्हा पुन्हा पडावा अशीच ही सारी परिस्थिती आहे.

 

 

     हे काय आताच घडत आहे का, किंवा काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात असे घडत नव्हते का असा प्रश्न यावर भक्त मंडळी विचारू शकतात, कारण आपल्या चुकांची तुलना देखील इतरांशी करण्यात त्यांना मोठा आनंद मिळतो. महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढायला सुरुवात झाली त्याला आता अडीच तीन दशके होत आहेत, पण याचीही सुरुवात अधिक झाली ती राज्यात युतीचे सरकार आल्यानंतर . त्या अगोदर झालेल्या राजकीय व्यक्तींच्या खुनामध्ये शिवसेनेच्या काही नेत्यांची नावे आली होतीच ,पण युतीचे सरकार आल्यानंतर 'तुमचा तो तर आमचा हा' असेच म्हणायला सुरुवात झाली. गुंडांना राजाश्रय मिळू लागला. आणि मग एका पक्षाने अमुकला पोसले म्हणून दुसऱ्या पक्षाने तमुकला संरक्षण देण्याची जी विषारी बीजे महाराष्ट्राच्या मातीत रोवली गेली, त्याची विषवल्ली आज संपूर्ण महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेला आपल्या कवेत घेऊ पाहत आहे, आणि हेच घातक आहे. गोपीनाथ मुंडे काय किंवा आर आर पाटील काय यांनी किमान गुंडगिरीचा सामना करण्याची तयारी तरी दाखविली होती. यात राजकीय आश्रयातून आलेल्या गुंडांना धक्का लागला नसला तरी इतर गुन्हेगारांना त्यांनी वचक बसविला होता, आज ती धमक देवेंद्र फडणवीस दाखवू शकतात का? हा प्रश्नच आहे. मुळात पोलिसांनी कोणत्याही गुंडाला हात लावण्याचा जरी प्रयत्न केला तरी वरपासून फोन येतात आणि पोलिसांना हात चोळत बसावे लागते हे वास्तव आहे, त्यामुळे मग नको ते साहस करायचं  कशाला अशी मानसिकता जर व्यवस्थेची होत असेल, तर सुव्यवस्था राहणार कशी? राज्याच्या गृहमंत्र्यांनी याचे उत्तर द्यायला हवे.
 

Advertisement

Advertisement