देशभरात इंडिया आघाडीला धक्के बसत असतांनाच महाराष्ट्रात मात्र काँग्रेससह महाविकास आघाडीने किमान राजकीय शहाणपणा दाखविला आहे असेच म्हणावे लागेल. मागच्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे राजकीय गणित बऱ्यापैकी बिघडले होते. तेव्हापासून वंचित आघाडी ही खऱ्याअर्थाने महाविकास आघाडीचा भाग असली पाहिजे असे जे राजकीय समीकरण अपेक्षित होते, ते आता साधताना दिसत आहे. वंचितच्या महाविकास आघाडीमधील सहभागाची घोषणा काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) गटाकडून झाली आहे. आता फक्त महाविकास आघाडीमधील कोणत्याच पक्षाने 'हुंड्यावरून लग्न मोडण्याचे' राजकारण करू नये इतकेच.
महाराष्ट्रात आंबडेकरवादी राजकारणातील महत्वाची शक्ती म्हणून मागच्या काही काळात प्रकाश आंबेडकर यांचा प्रभाव वाढलेला आहे.हे मान्यच करावे लागेल.पँथर,रिपाई,रिपाइंच्या सर्व गटांचे ऐक्य,अगदी प्रकाश आंबेडकरांचा पूर्वीचा भारिप,हे सर्व प्रयोग मागे पडल्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी आंबेडकरवाई मतांना इतर काही मतांची जोड देऊन वंचित बहुजन आघाडीचा प्रयोग महाराष्ट्राला दिला.मागच्या निवडणुकांमध्ये या आघाडीने 'एमआयएम'ला सोबत घेतले. या आघाडीचे स्वतःचे किती उमेदवार निवडून आले हा भाग वेगळा असला तरी या आघाडीमुळे काँग्रेस राष्ट्रवादीचे राजकीय गणित बऱ्यापैकी बिघडले हे महाराष्ट्राने अनुभवले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची राजकीय अपरिहार्यता तशी महाविकास आघाडीला चांगली माहित होती. आता तर ज्यावेळी काँग्रेसकडून मोदींच्या एकाधिकारशाहीला सर्वांनी एकत्र येऊन मुकाबला करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली जात असतानाच्या काळात वंचित बहुजन आघाडी ही नैसर्गिक मित्र म्हणून काँग्रेससोबतच्या आघाडीचाच भाग असणे आवश्यक होते.
महाराष्ट्रात काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना (उबाठा) यांची महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर धर्मनिरपेक्ष किंवा संवैधानिक मुल्य्यांना जाती,धर्माच्या अगोदर प्राधान्य देणाऱ्या मतांची विभागणी होऊ नये हे पाहणे या आघाडीला आवश्यक होते. मागच्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका, लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये वंचितच्या उमेदवारांनी सरासरी एक लाखापेक्षा अधिकच मते घेतली, हीच मते जर त्यावेळी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या उमेद्वारांसोबत जोडली गेली असती, तर साहजिकच निवडणुकांचे निकाल वेगळे असते. त्यामुळेच आता तरी वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीचा भाग असणे आवश्यक होते. किंबहुना ती महाविकास आघाडीची राजकीय गरज होती. तसा प्रकाश आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतील समावेशाला कोणाचाच विरोध नव्हता.शिवसेना (उबाठा) असेल किंवा राष्ट्रवादी,या पक्षांच्या नेत्यांच्या प्रकाश आंबेडकरांशी भेटी झाल्याचं होत्या, अडचण होती ती काँग्रेसमधील निर्णय प्रक्रियेची.या पक्षातील दरबारी राजकारणाचा भाग असेल किंवा दूध पोळत असल्याने ताक देखील फुंकून पिण्याची काँग्रेसी मानसिकता,काँग्रेस कोणत्याच राजकीय निर्णयात घाई करताना दिसत नाही,त्यामुळे अनेकदा पक्षाचे तात्कालिक नुकसान देखील झालेले आहेच, मात्र तरीही काँग्रेसच्या संथ निर्णय प्रक्रियेमुळेच प्रकाश आंबेडकरांचे नेमके काय करायचे हा प्रश्न महाविकास आघाडीसमोर होता.त्याला एकदाचा पूर्णविराम मिळाला आहे. प्रकाश आंबेडरांच्या वंचितचा महाविकास आघाडीत प्रवेश झाला आहे.
अर्थात हा पूर्णविराम असला तरी आता पुढील वाक्य लिहायचे आहे, आणि त्याची सुरुवात नक्कीच सोपी असणार नाही. महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकरांच्या वंचितला सोबत घेऊन आता जागा वाटपाची दिशा ठरवावी लागणार आहे.मुळातच राष्ट्रवादी आणि शिवसेना (उबाठा) या दोन पक्षांमध्ये पडलेल्या फुटीनंतर साहजिकच २०१९ च्या स्थितीत आज कोणताच पक्ष नाही. आजच्या घडीला केवळ २०१९ च्या परिस्थितीचा विचार करता काँग्रेसचं अखंड राहिलेली आहे. (महाराष्ट्रापुरती तरी) त्यामुळे साहजिकच जागावाटपाच्या चर्चांमध्ये काँग्रेसचे पारडे जड आहे. मात्र ज्यावेळी एखादे मोठे ध्येय गाठायचे असते, त्यावेळी छोट्या कुरबुरी,स्वतःचे अहं बाजूला ठेवून चार दोन पाऊले पुढे मागे होण्याची लवचिकता दाखवावी लागते.महाविकास आघाडीमधील सर्वच पक्षांना ती लवचिकता दाखविता येते का यावरच आता जागावाटपाचा भवितव्य अवलंबून असणार आहे .