सारे राजकारण आपल्या भोवतीच फिरले पाहिजे आणि आपण म्हणू तेच घडले पाहिजे असे आत्ममग्न राजकारण हीच नितीशकुमार यांच्या राजकारणाची ओळख राहिलेली आहे. त्यामुळे नितीशकुमार यांच्या आजच्या भूमिकेचे फारसे आश्चर्य राहिलेले नाही. नितीशकुमार यांना असेही भाजपच्या विचारधारेचे वावडे कधीच नव्हते, त्यांचा संघर्ष राहात आला आहे तो राजकारणाच्या केंद्रस्थानी स्वत: असण्याचा. कॉंग्रेस जर इंडिया आघाडीचे नेतृत्व करणार असेल तर साहजिकच नितीशकुमार यांना 'अपेक्षित' महत्व मिळणार नाही हे लक्षात आल्याने नितीशकुमार यांनी पलटी मारणे अपेक्षितच होते.
भारतातील राजकारण दिवसेंदिवस इतके अस्थिर होत चालले आहे की कोणत्या क्षणी काय होईल हे सांगताच येत नाही. कालची घोषणा किंवा शपथ किंवा भूमिका आज जरी कायम राहिली तर आश्चर्य वाटेल अशा वळणावर आपली लोकशाही येऊन पोहोचली आहे. सत्ताकारण हेच जेंव्हा राजकारणाचे अंतिम साध्य असते, त्यावेळी मग राजकीय नैतिकता आपोआपच अडगळीला पडत असते. आज बिहारमध्ये जे काही घडत आहे ते याच केवळ आणि केवळ सत्ताकारणाचाच एक भाग आहे. तसे नसते तर 'मरेंगे पर भाजपके साथ नही जायेंगे' म्हणणारे नितीशकुमार भाजपच्या सोबत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतात आणि 'नितीशबाबू पलटुराम है, उनके लिये हमारे दरवाजे सदाके लिये बंद है' म्हणणारे अमित शहा त्यांचे स्वागत करतात याला काय म्हणणार?
अर्थात नितीशकुमार यांच्यासाठी काही राजकीय पलटी नवीन नाही. जी व्यक्ती कधी एनडीए, कधी महागठबंधन तर कधी आणखी कोणत्या आघाडीचा भाग बनूनअवघ्या १४ वर्षात तब्बल आठ वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असेल तिच्या राजकीय निष्ठांबद्दल किंवा राजकीय विचारधारेबद्दल खरे तर चर्चाच करण्याचे कारण नाही. कारण आत्ममग्नता हीच नितीशकुमार यांच्या राजकारणाची ओळख राहिलेली आहे. कधी भाजपने आपला सन्मान राखला नाही म्हणत तर कधी कॉंग्रेसने अपमानित केले म्हणत नितीशकुमार यांनी आपल्या राजकीय पलट्यांचे भलेही वारंवार समर्थन केले असेल, मात्र त्यांची प्रत्येक पलटी केवळ आणि केवळ स्वकेंद्रीच राहिलेली आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. मात्र असे असले तरी बिहारमध्ये भाजप असो अथवा कॉंग्रेस, दोघांनाही नितीशकुमार आपल्यासोबत हवे असतात. अगदी लालूप्रसाद यादव यांनाही.
म्हणूनच त्यांचा पक्ष बिहार विधानसभेत संख्याबळाने तिसरा असला तरी ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कायम आहेत. बिहारसारख्या जातीय राजकारणाच्या दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या राज्यात ओबीसीकेंद्री राजकारण ही नितीशकुमार यांची राजकीय खेळी राहिलेली आहे, यात अल्पसंख्याक समाज सोबत आला तर ठीकच,पण नसेल तरी फार काही नाही हा राजकीय मार्ग नितीशकुमार यांनी स्वत:साठी निवडला आहे, त्यामुळेच त्यांना कधीच भाजपचे वावडे राहिलेले नाही. कोणाच्या का होईना, सहकार्याने सत्ताकारण करताना, आपली ओबीसी व्होटबॅंक अधिकाधिक मजबूत कशी होईल हे पाहायला मात्र नितीशकुमार कधी विसरलेले नाहीत, म्हणूनच ओबीसींची जातनिहाय जनगणना करणारे बिहार हे देशातले पहिले राज्य बनलेले आहे. आपले शक्तीस्थान काय आहे हे ओळखून, त्याला धक्का न लागता कोणत्याही राजकीय उड्या ते मारत आले आहेत. आता त्यांनी पलटी मारुन पुन्हा भाजप म्हणा किंवा एनडीए, यांचा हात धरला आहे. नितीशकुमार यांनी हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारने कर्पुरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न जाहीर केला, नितीशकुमार हे राजकारणात वाढले ते जयप्रकाश नारायण, कर्पुरी ठाकूर यांच्याच छत्रछायेत. म्हणूनच कर्पुरी ठाकूर यांना दिलेला भारतरत्न आणि नितीशकुमार यांची आजची भूमिका यात निश्चितपणे संबंध आहेच. आपण कोणताही निर्णय घेताना ओबीसींचे हित कसे पाहतो हेच नितीशकुमार यांना दाखवायचे होते.
या साऱ्या घटनाक्रमात नितीशकुमार यांच्या भूमिकेचे आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. ते स्वत:च्या परंपरेलाच जागले आहेत. मुळात नितीशकुमार यांचा जनाधार निर्णायक असला तरी एकट्याने सत्तेत येण्याइतका नाही. त्यामुळे नितीशकुमार यांना कोणाच्या ना कोणाच्या सहकार्याची आवश्यकता नेहमीच असते. त्यामुळे नितीशकुमार मुख्यमंत्री तर होतात, मुख्यमंत्री होण्यासाठी किंवा सत्तेत येण्यासाठी त्यांना इतरांचे सहकार्य तर हवे असते, मात्र त्याचवेळी त्यांना सरकारमध्ये इतरांचे काही ऐकायचे देखील नसते. म्हणूनच मग नितीशकुमार स्वत: मुख्यमंत्री कायम असतात, बदलतात ते उपमुख्यमंत्री, पण तरीही नितीशकुमार ही भाजप काय किंवा कॉंग्रेस काय, या दोघांचीही अपरिहार्यता ठरत आहेत त्याचे काय? राष्ट्रीय म्हणविणाऱ्या या दोन पक्षांची बिहारमधली ही फरफट काय सांगतेय?