गरिबी आणि श्रीमंती मोजायची असते ती या दोन्हीचे एकूण लोकसंख्येमध्ये असणारे प्रमाण किती आहे त्यावरून. अर्थव्यवस्था सक्षम आहे की नाही ते त्या अर्थव्यवस्थेत किती लोक अब्जाधिश आहेत किंवा अति श्रीमंत आहेत यावरून ठरू पाहिले तर सारेच गणिते चुकत राहतात. भारताच्या बाबतीत तेच होत आहे.जागतिक पातळीवर अब्जाधिशांच्या संख्येची तुलना केली तर भारत तिसर्या क्रमांकावर जातो. मात्र या अभिमानाचा फुगा फुटतो तो दरडोई उत्पानाच्या बाबतीत.या संदर्भात विश्वगुरू होऊ पाहत असलेला आपला देश थेट १२० व्या क्रमांकावर आहे.ही दरी सांधायची कशी?
मागच्या काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था कशी वेग घेत आहे.आपण किती आणि कसे विकसित झालो आहोत. विशेषत:आपला देश विश्वगुरू होण्याचा प्रयत्न करत असताना सार्या जगावर आपल्या अर्थव्यवस्थेचा कसा पगडा आहे हे सांगण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे.हे सांगण्यासाठी भारत ही जगातली अमूक एका क्रमांकाची अर्थव्यवस्था कशी बनली आहे हे सांगितले जाते.त्यासाठी मग जगातील काही प्रमुख अतिश्रीमंत व्यक्ती भारतात कशी आहेत याची उदाहरणे दिली जातात.मात्र प्रत्यक्षातील चित्र काय असते याकडे जाणिवपूर्वक डोळेझाक केली जाते.कोणत्याही अर्थव्यवस्थेला उद्योगपती महत्वाचे असतातच,नाही असे नाही.त्यामुळे उद्यमशिलता जपत ज्यांनी पैसा कमावला आहे त्यांच्याबद्दल व्देष असण्याचे काहीच कारण नाही.जगात सर्वाधिक अब्जाधिश असणार्या देशांमध्ये भारताचा क्रमांक तिसरा लागतो.ही तशी आनंदाचीच गोष्ट.याही क्रमवारीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकावर आहे.अमेरिकेतील बिलीनियर्सची संख्या ७२६ सांगितली जाते.तर भारतात १८० बिलिनिअर्स आहेत.भारताची लोकसंख्या,भारताचा विस्तार आणि भारताची अर्थव्यवस्था या सार्याचा विचार केल्यास आपण भलेही स्वत:ला विश्वगुरू म्हणत असू पण अमेरिकेच्या तुलनेत आपण आजही दूरच आहोत हे मान्यच करावे लागते.
ही झाली एक बाजू.आता अर्थव्यवस्थेच्या दुसर्या बाजूकडे वळूयात.ती जखम मात्र अधिक ठसठसणारी आहे, प्रसंगी जिव्हारी लागणारी आहे.ज्या अमेरिकेचा क्रमांक बिलिनिअर्सच्या बाबतीत पहिला आहे त्या अमेरिकेचे दरडोई उत्पन्न आहे ७६ हजार ३९९ आणि बिलिनिअर्सच्या बाबतीत तिसर्या क्रमांकावर असणार्या भारताचे वार्षिक उत्पन्न आहे ते ८ हजार ३३९ .क्रमवारीत सांगायचे झाले तर दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगात अमेरिका आठव्या क्रमांकावर आहे आणि भारत मात्र १२० व्या क्रमांकावर. आता इतका मोठा फरक असेल आणि दरडोई उत्पन्न इतके कमी झालेले असेल तर कोणत्या तोंडाने आपण आपल्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीच्या गप्पा मारत आहोत याचे एकदा उत्तर अर्थमंत्र्यांनी द्यायला हवे.मागच्या काही काळात सर्वच देशाच्या अर्थव्यवस्था डळमळीत होऊ लागल्या आहेत. अगदी शेजारच्या चीनच्या बाबतीतही फार चांगले म्हणावे अशी परिस्थिती नाही.चीनमधून जागतिक गुंतवणूकदार बाहेरच्या देशांकडे वळू लागले आहेत.पण या परिस्थितीचा फायदा घेण्याची संधी भारतासारखा देश दाखवत आहे का? हा मोठा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर शोधू गेल्यास आजतरी केवळ नकारात्मकता पदरात पडते.
कोणत्याही अर्थव्यवस्थेचा डोलारा उभा राहिलेला असतो. तो त्या अर्थव्यवस्थेतील शेवटच्या घटकावर.त्या देशाच्या सामान्य नागरिकांच्या क्रयशक्तीवर. ती क्रयशक्ती जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत कोणत्याच अर्थव्यवस्थेला बळकटी येत नाही.अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर एखाद्या अतिश्रीमंताच्या हातात लाखभर रूपये पडले तर ते थेट त्याच्या तिजोरीत जातात किंवा गुंतवणूक म्हणून ठेवले जातात. त्याचा बाजारपेठेवर फार काही परिणाम होत नाही.पण तेच एक लाख एखाद्या मध्यमवर्गीयाच्या किंवा गरिबाच्या हातात पडले तर त्यातले किमान ७० टक्के रक्कम कोणत्या ना कोणत्या खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठेत येते आणि चलन फिरते राहते. म्हणूनच सामान्यांची क्रयशक्ती वाढणे कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे असते.या मुद्याच्या अनुषंगाने विचार केला तर खरोखरच आज अर्थव्यवस्थेत आपण कोठे आहोत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता पडणार नाही.मध्यंतरी ज्या ई कॉमर्सचा फुगा मोठ्या प्रमाणावर फुगला होता त्याला देखील कोरोना आपत्तीनंतर टाचणी लागली आहेच. नुकत्याच संपलेल्या दिवाळी आणि नंतरच्या वातावरणात भारतातला ई-कॉमर्सचा व्यवसाय तब्बल ४० टक्यांनी कमी झाला.बाकी रोजच्या जगण्यातील वाढती बेरोजगारी, अधिकच बेभरवशाची होत असलेली शेती,सामाजिक अस्थिरतेमुळे छोट्या उद्योगांवर झालेला परिणाम या सार्या गोेष्टी आहेतच.आपण विश्वगुरू होण्याच्या गप्पा मारत असतानाही दारिद्रय रेषेखालील लोकांची संख्या अजूनही कमी होत नाही किंबहुना तो टक्का सातत्याने वाढतच आहे. याचे उत्तर आपण नेमके कशात शोधणार आहोत? जागतिक पातळीवरील दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीने सामाजिक,आर्थिक दरीचा जो आरसा देशाला दाखविला आहे त्यातून आता तरी काही शिकायचे आहे का पुन्हा एकदा केवळ टाळ्या मिळविणार्या घोषणा आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मतांची बेगमी करण्यासाठीची तुटीची अंदाजपत्रक हेच आपलं भविष्य राहणार आहे?