Advertisement

संपादकीय अग्रलेख - इव्हेंटचे राजकारण

प्रजापत्र | Friday, 12/01/2024
बातमी शेअर करा

 मनुष्य हा उत्सवप्रिय प्राणी असल्याची व्याख्या समाजशास्त्र करते. त्यामुळे त्याच व्याख्येचा मानसशास्त्रीय आधार घेऊन प्रत्येक गोष्टीचा उत्सव करीत त्याचा राजकीय फायदा उठविण्याचे प्रकार सध्या वाढले आहेत, आणि भाजपच्या तर ते अंगवळणी पडले आहेत. त्यामुळेच राम मंदिराच्या लोकार्पणाचा, म्हणजे रामलल्लाच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेचा देखील थेट राजकीय इव्हेन्ट केला जाऊ लागला आहे. या महोत्सवाचे  खरेच धार्मिक अधिष्ठान जपायचे असते, तर चारही शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठान सोहळ्याचे निमंत्रण धुडकावले याची दाखल राम मंदिर न्यास आणि सरकार दोघांनीही घेतली असती.
 

 

या महिन्याच्या २२ राखेला अयोध्येमध्ये राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. भगवान रामाची बालरुपातली  मूर्ती मंदिरात विराजमान केली जाईल. हे सारे (म्हणजे राम मंदिराचे बांधकाम ) सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणातला निकाल दिल्यामुळे होत असले तरी जणू या साऱ्याचे करते करविते पंतप्रधान नरेंद्र मोदीच आहेत असेच वातावरण देशभरात निर्माण केले जात आहे.इतरांनी कोणी काही सांगण्याचा प्रयत्न केला तरी आज ते ऐकून घेण्याची कोणाची इच्छा नाही. जणू काही प्रभू श्रीरामांचा वनवास संपला तोच मुळी नरेंद्र मोदींमुळे असेच काहीसे चित्र मोदी भक्तांनी निर्माण केले आहे, आणि ते चित्र राम ज्यांचे श्रद्धास्थान आहे, त्यांच्या गळी उतरविले जात आहे . हे सारे करताना या कार्यक्रमाला, खरेतर हा कार्यक्रम धार्मिक असायला हवा होता , एखाद्या महोत्सवाचे स्वरूप कसे येईल आणि याचा राजकीय फायदा कसा उठविता  येईल हेच पहिले जात आहे. मुळात हा कार्यक्रम राम मंदिर न्यासाच्या आहे, केंद्र सरकारचा आहे का भाजपचा आणि संघ परिवाराचा हेच लक्षात येणे अवघड आहे. इतके हे सारे घटक यात एकरूप झाले आहेत. साऱ्याच यंत्रणा राम रंगी रंगल्याने असेल कदाचित , पण यातून कोणा एकाला वेगळे काढणे कठीण आहे. अर्थात आताच्या काळात सरकारी यंत्रणेने धार्मिक कार्यक्रमाचा भाग होऊ नये असली काही संवैधानिक मूल्ये सांगणे म्हणजे अरण्यरुदन ठरणार आहे, त्यामुळे ते सांगण्याचे धाडस करण्याचे देखील कारण नाही. कारण ज्यावेळी सोमनाथच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम होता, त्यावेळी तो शासकीय खर्चाने होऊ नये आणि तत्कालीन राष्ट्रपतींनी त्याला उपस्थिती लावू नये, अशी अपेक्षा करणारे पंतप्रधान नेहरू आणि त्याला प्रतिसाद देणारे राष्ट्रपती राजेंद्रबाबू आजच्या भक्तांच्या व्याख्येत अगोदरच धर्मद्रोही ठविले जाऊ शकतात. त्यामुळे आता पंतप्रधानांनी पूजेचे यजमान म्हणून जावे का असल्या चर्चांना आज तरी काही अर्थ उरलेला नाही. 'कालाय तस्मै नमः' म्हणून  पुढे जायचे इतकेच.

 

 

पण हे सारे बाजूला सोडले तरी, ज्यांना कोणाला म्हणून धर्माचा अभिमान आहे, आणि भगवान श्रीरामांच्या बालरूपातील मूर्तींच्या प्रतिष्ठापनेमुळे धर्माला आलेली ग्लानी दूर होणार आहे, 'यदा यदा ही धर्मस्य ' चा भगवंताने दिलेला शब्द प्रत्यक्ष अवतरणार आहे, असा ठाम विश्वास आहे, त्यांनी तरी हा कार्यक्रम दीघार्मिक स्वरूपाचा असावा अशी अपेक्षा करण्यात गैर ते काय ? जर कोणी अशी अपेक्षा करणार असेल तर त्याला धर्मद्रोही तर नक्कीच म्हणता येणार नाही. ज्यांची ज्यांची हिंदू धर्मावर धारणा  आणि विश्वास आहे, त्यांना हिंदू धर्मातील चारही शंकराचार्यांचे स्थान देखील वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता असेल वाटत नाही. हिंदू धर्मातील सर्वोच्च आचार्य म्हणून शंकराचार्यांची गणना होते, चारही पिठांच्या शंकराचार्यांचे याबाबतीतले स्थान वादातीत आहे. त्यामुळे जर खरोखरच पाचशे वर्षानंतरचा असा एखादा प्रसंग साजरा होणार असेल तर तो शंकराचार्यांच्या हस्ते आणि उपस्थितीत साजरा होणे आवश्यक आहे, अशी भाबडी धर्मश्रद्धा कोणी उपस्थित करणार असेल तर त्यात गैर ते काय ? मात्र राम मंदिराच्या लोकार्पणाच्या या सोहळ्याला चारही शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत . किमान आजच्या मितीला (तारखेला नाही बरं ) तरी चारही शंकराचार्यांनी या निमंत्रणाकडे पाठ फिरविल्याचे स्पष्ट आहे. जर प्राणप्रतिष्ठा इतर कोणी करणार असतील तर आम्ही तिथे येऊन करायचे तरी काय ? या शंकराचार्यांच्या युक्तिवादाचे उत्तर कोणत्या तरी धर्माभिमानी व्यक्तीने द्यायला हवे. खरेतर इतके सारे झाल्यानंतर राम मंदिर न्यासाच्या वतीने काही तरी खुलासा यायला हवा होता. मात्र अजूनतरी तसे काही समोर आलेले नाही.

 

 

या साऱ्या अडचणीच्या विषयावर आता राम मंदिर न्यास काही बोलत नाही , आपल्या पंतप्रधानांना तर वादाच्या विषयात काही बोलायचेच नसते , राहिला प्रश्न भक्तांचा,( राम भक्तांचा नव्हे मोदी भक्तांचा ), तर त्यांना जे काही भाजपच्या यंत्रणेतून सांगितले जाईल, तेच ते बोलतील. सोहळ्याला शंकराचार्य उपस्थित राहणार नाहीत. हिंदू धर्मातील आस्थेप्रमाणे पौष महिन्यात असे कोणते सोहळे हाती घेतले जात नाहीत , मात्र इतरवेळी मुहूर्ताची फार चर्चा करणारी भक्तमंडळी याकडेही दुर्लक्ष करायला तयार आहेत. एकूण काय तर धार्मिक अधिष्ठान असलेल्या कार्यक्रमाचे जाणीवपूर्वक, हर प्रयत्नाने राजकीयीकरण होत आहे आणि नागरिक मात्र 'राम रखी राखा ' म्हणजे 'राम ठेवील तसे' म्हणून गप्प आहेत. 

Advertisement

Advertisement