Advertisement

संपादकीय अग्रलेख- सत्तालोलूप मानसिकता

प्रजापत्र | Monday, 08/01/2024
बातमी शेअर करा

 राज्याभिषेक होण्याच्या पूर्वसंध्येला केवळ पित्याचे वचन राखायचे म्हणून वनवास स्विकारणारी रामाची संस्कृती उदात्त म्हणून तिचा गौरव करायचा आणि त्याचवेळी राजकारणातील बाप निवृत्त का होत नाही म्हणून सवाल विचारीत राजकीय बापाच्याच विरोधात बंड करायचे हा दुटप्पीपणा सध्या राजकारणात राजमान्य केला जात आहे. आणि अजित पवार त्याचे कर्तेधर्ते होत आहेत. वरतून पुन्हा आपण केले ते कसे आवश्यक होते हे सांगण्याचा त्यांचा अट्टाहास केवळ त्यांची सत्तालोलूप मानसिकता दाखविणारा आहे.
 

 

     समाजाला रुचणार नाही, सहजासहजी पचनी पडणार नाही अशी एखादी कृती ज्यावेळी केली जाते, त्यावेळी त्या कृतीचे समर्थन करताना आपण काय बोलत आहोत याचेही भान अनेकदा राहत नाही. अजित पवारांचे सध्या तेच सुरु आहे. घरातील वडीलधाऱ्याने लेकरं वयात आल्यावर त्यांना काही जबाबदाऱ्या आणि अधिकार द्यायलाच हवे असतात, पण म्हणून लेकरांनी लगेच, आता बापाने प्रपंचातून लक्षच काढून घ्यावे अशी अपेक्षा धरने कितपत योग्य आहे. आपले तारुण्य वडीलांना अर्पण करणाऱ्या राजकुमाराची किंवा पित्यासाठी कायम अविवाहित राहणाऱ्या भिष्माची संस्कृती म्हणून आपण हिंदू संस्कृतीकडे पाहतो. या संस्कृतीमधील राम काय किंवा श्रीकृष्ण काय, ज्येष्ठांचा आदर कसा करावा हे सांगायला ही उदाहरणे पुरेशी आहेत. या ठिकाणी जाणिवपूर्वक हिंदू संस्कृतीचाच उल्लेख यासाठी की हिंदुत्व आणि हिंदू संस्कृतीचा मक्ता जणू केवळ आपल्याकडेच आहे, असे समजून वागणाऱ्या, किमान तसे भासविणाऱ्या भाजपसोबत, शरद पवारांविरोधात बंड करुन अजित पवार गेले आहेत.

 

 

     अजित पवारांचे हे असे जाणे, भलेही त्यांच्या निकटवर्तीयांना आवडले असेल आणि आपण विकासासाठीच सत्तेसोबत गेलो आहोत असे अजित पवार सांगत असले तरी मुळात अजित पवार सत्तेच्या बाहेर राहुच शकत नाहीत, इतके ते सत्तेला चटावलेले आहेत, मग त्यासाठी ते काहीही करु शकतात हे महाराष्ट्राला नव्याने सांगण्याची आवश्यकता नाही. मुळात राष्ट्रवादीची स्थापना १९९९ ला झाल्यानंतर नंतरची १५ वर्ष म्हणजे २०१४ पर्यंत हा पक्ष सत्तेत होता. आणि या सत्तेचे सर्वात मोठे लाभार्थी अजित पवार होते. शरद पवारांनी १९९९ पासूनच देशाच्या राजकारणात लक्ष केंद्रित केले होते आणि राज्यासाठी बऱ्यापैकी मोकळा हात अजित पवारांना दिला होता, हे सत्य नाकारता येणार नाही.  

   

 

 असे असताना आता जर अजित पवार शरद पवार थांबत का नाहित हा प्रश्न विचारणार असतील तर त्यांना हिंदू संस्कृतीची आठवण करुन देण्यात चुक ते काय? सत्तेसाठी महाराज उग्रसेनांना कारावासात टाकणारा कंस या संस्कृतीने कधी आदर्श मानला नाही. यासाठी कधी कोणी उग्रसेनांचे वय झाले होते असा पोकळ युक्तीवादही केला नाही. कंसाचे जाऊद्या, या देशातील एक समूह औरंगजेबाला दुषणे देतो तो औरंगजेबाने सत्तेसाठी पित्याच्या विरोधात बंड केले म्हणूनच ना? मग आज अजित पवार केवळ शरद पवारांचे वय झाले तरी ते थांबायला तयार नाहीत असा युक्तिवाद करुन स्वत:च्या बंडाचे समर्थन करणार असतील तर ते नेमके कोणत्या मानसिकतेचे वाहक आहेत? हा प्रश्न अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना जिव्हारी लागणार आहे हे मान्य, पण नियती अनेकदा अशा कठोर वास्तवाला सामोरे जायला लावित असतेच. आज अजित पवार जर शरद पवार थांबत नाहीत म्हणून थेट विरोधी विचारधारेशी सोयरीक करणार असतील तर याला सत्तालोलूप मानसिकतेपलीकडे कोणता शब्द योजता येईल.

 

 

 

     आज अजित पवार ज्या शरद पवारांना 'त्यांनी आता थांबायला हवे' असे म्हणतात, त्याच शरद पवारांनी अजित पवारांचे कितीतरी राजकीय प्रमाद पोटात घातले आहेतच. बरे शरद पवारांनी थांबण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी त्यांना अडविले. महाराष्ट्रातील राजकीय मैदान शरद पवारांनी केंव्हाच अजित पवारांसाठी मोकळे केले होते, मग असे असताना शरद पवार थांबत नाहीत म्हणून आपल्याला वेगळी भूमिका घ्यावी लागली या अजित पवारांच्या सांगण्यात कितपत नैतिकता आहे? बरे, आता हाच न्याय ते त्यांच्यासोबत आलेल्या इतर नेत्यांना लाऊन त्यांना निवृत्त करणार आहेत का? कारण कर्तबगार पुतणे किंवा पुत्र असणाऱ्यांची संख्या अजित पवारांसोबतच्या राष्ट्रवादीत मोठी आहे. मग निवृत्तीचा युक्तीवाद अजित पवार केवळ स्वत:पुरताच वापरणार आहेत का?  

Advertisement

Advertisement