Advertisement

प्रजापत्र अग्रलेख - बळाचा देखील घ्यावा अंदाज

प्रजापत्र | Saturday, 30/12/2023
बातमी शेअर करा

     राजकारणावर भूतकाळातील घटनांचा परिणाम होत असेलही, मात्र राजकारण, त्यातही निवडणुकीचे राजकारण चालते ते वर्तमानावर. अनेक राजकीय पक्षांचा भूतकाळ फार उज्वल होता, म्हणून आजही त्यांची तीच क्षमता असेल असे नाही, आणि म्हणूनच राजकारणातले निर्णय घ्यायचे असतात ते आजच्या क्षमतेवर, शक्तीवर. त्याचा अंदाज व्यवस्थित घेता आला तरच कोणालाही राजकीय वाटचाल व्यवस्थित करता येते, याची जाणीव इंडिया आघाडीतील महाराष्ट्रातील सर्वच पक्षांनी करून घेण्याची आवश्यकता आहे.
      इंडिया आघाडीची स्थापना झाल्यापासून चर्चा आहे ती या आघाडीचे जागा वाटप कसे होईल याची. अगदी सुरुवातीपासून या आघाडीतील सहभागी पक्षांचा विचार केला तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये यातील पक्षांना जागावाटपाच्या एका समान सूत्रात बांधून ठेवणे अवघड आहे हे स्पष्ट दिसत आलेले आहे, आणि म्हणूनच भाजप या आगगाडीच्या संभावना करीत आलेला आहे. आता या आघाडीची जागा वाटप किती अवघड असणार आहे याची चुणूक मिळू लागली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस पक्ष आम आदमी पक्षासोबत तडजोडीला तयार नाही. बिहारमध्ये जेडीयू काँग्रेसला फारसे महत्व द्यायला तयार नाही. आमची आघाडी आरजेडीसोबत आहे आणि काँग्रेस आरजेडीची भागीदार असल्याने काँग्रेसला किती जागा द्यायच्या ते आरजेडीने त्यांच्या कोट्यातून ठरवावे असे जेडीयू म्हणत आहे. पश्चिम बंगालमध्ये तर तृणमूल आणि डाव्यांना एकत्र आणताना मोठी कसरत होणार आहे, तेथील चर्चा अजून सुरु व्हायच्या आहेत, आणि जागा वाटपातील रस्सीखेचीचा किस्सा आता महाराष्ट्रातही सुरु झाला आहे.
      महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी स्थापन झाली होती, आणि नंतरच्या अनेक चढउतारामध्ये देखिल आघाडी अखंडित राहिली, ते पाहता महाराष्ट्रात तरी जागावाटपात फार अडचणी येणार नाहीत असे अपेक्षिले गेले होते. मात्र आता महाराष्ट्रात देखिल जागावाटप हे आघाडीमध्ये बिघाडीचे कारण ठरते का असा संशय बळावला आहे. महाराष्ट्रात ज्या ज्यावेळी शिवसेना कोणासोबत युती करते, त्यावेळी सुरुवातीला शिवसेनेची भूमिका नेहमीच आक्रमक राहिली आहे. अगदी बाळासाहेबांच्या काळात देखिल भाजपसोबत जागावाटपाचा सूत्र ठरविताना शिवसेनेने अमुक इतक्या जागांवर अडून बसायचे आणि नंतर मग भाजपच्या त्यावेळच्या नेत्यांनी मातोश्रीवर जाऊन तडजोड करायची असे ठरलेले असायचे. आता पुन्हा तोच कित्ता उद्धव ठाकरे गट गिरवू पाहात आहे. ठाकरे गटाला महाराष्ट्रात लोकसभेच्या २३ जागा हव्या आहेत. जागा हव्या असण्यात काही गैर नाही, मात्र या २३ जागा हव्या असण्याचे जे कारण ठाकरे गट देत आहे, ते मात्र राजकीय जाणकार तर सोडा, अगदी सामान्य व्यक्तीला देखिल पटणारे नाही. आम्ही मागच्या वेळी २३ जागा लढविल्या होत्या म्हणून यावेळीही आम्हाला तितक्याच जागा हव्यात हा शिवसेना ठाकरे गटाचा हट्ट आहे. मुळात मागच्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेने त्यावेळी २३ जागा लढविल्या, १८ जागा जिंकल्या , पण आज त्या १८ मधील किती खासदार शिवसेनेच्या ठाकरे गटासोबत आहेत? त्यावेळी शिवसेनेच्या खासदारांच्या विजयात मोदींच्या जादूचा वाटा नव्हता असे म्हणता येईल का ? मग आजची राजकीय परिस्थिती काय आहे? निवडणुका लढवायच्या असतात त्या जिंकण्यासाठी का केवळ आम्ही किती जागा लढविल्या हे दाखविण्यासाठी? आज खरोखर ठाकरे गटाला २३ जागा समजा दिल्याचं तर त्यांच्याकडे या २३ जागांवर टक्कर देऊ शकतील असे तुल्यबळ उमेदवार खरोखर आहेत का? जी परिस्थिती शिवसेनेच्या ठाकरे गटाची आहे , तशीच अवस्था राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची आहे, अजित पवारांच्या बंडानंतर नाही  पवार गटाच्या राष्ट्रवादीला देखिल धक्का बसलेला आहेच, अनेक ठिकाणी त्यांच्यासमोर उमेदवार शोधण्याची कसरत आहेच. फक्त त्यांनी अद्याप अमुक जागांवर आमचा दावा अशी भूमिका घेतलेली नाही. या साऱ्या काळात महाराष्ट्रात तरी फारशी पडझड झाली नाही ती काँग्रेसची . मात्र मागच्या पंचवार्षिक मध्ये काँग्रेस पक्षाचे राज्यातून लोकसभेत अस्तित्व ते किती होते ? त्यामुळे कोणत्याच पक्षाने इतिहासातील शक्तीवर आज दावे करणे राजकीय दृष्ट्या अहंमन्यतेचे आहेत असेच म्हणावे लागेल.
आज समोर भाजपसारखा प्रबळ शत्रू असतांना , भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादीमधीलच अर्धी शक्ती स्वतःसोबत घेतलेली असताना , या शक्तीचा मुकाबला करण्यासाठी एकत्रित रित्या इलेक्ट्रॉल नेरीत पाहून उमेदवार द्यायचे आवश्यक असताना राजकीय वास्तवाच्या जाणिवेपासून दूर, केवळ आत्ममग्नतेत भटकायचे हे इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांनी, अगदी काँग्रेसनेही ठरविणे आवश्यक आहे.

 

Advertisement

Advertisement