Advertisement

संपादकीय अग्रलेख- काँग्रेस खरेच तयार आहे का ?

प्रजापत्र | Thursday, 28/12/2023
बातमी शेअर करा

स्थापनदिनाच्या निमित्ताने आज काँग्रेस नागपूरमध्ये 'है तैय्यार हम' म्हणत रॅली काढणार आहे. काँग्रेसच्या स्थापनेनंतर दुसऱ्यांदा स्थापना दिवसाची रॅली नागपुरातून निघणार आहे. संघाची जन्मभूमी असणाऱ्या नागपूरची काँग्रेसने आपल्या रॅलीसाठी निवड करावी हे तसे महत्वाचे आहेच, कारण आज संघप्रणीत राजकीय शक्तींचे जे आव्हान धर्मनिरपेक्षता आणि संवैधानिक मुल्यांनाच निर्माण केलेले आहे, त्या पार्श्वभूमीवर अशा शक्तींचे आव्हान पेलण्यासाठी काँग्रेस खरोखर तयार आहे का? हे आता पक्षाला दाखवावे लागणार आहे.

 

 

     आज काँग्रेसचा स्थापना दिवस. स्वातंत्र्यपूर्व काळात आजच्याच दिवशी, १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. त्याला आता १४८ वर्ष होत आहेत, म्हणजे ही संघटना आता दीड दशकाच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. या काळात काँग्रेसने अनेक आव्हाने पेलली, स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर देखील, या पक्षाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. मात्र या पक्षाने जी काही मूल्ये तत्व म्हणून स्वीकारली होती, त्या मूल्यांचे देशाच्या उभारणीत असलेले योगदान, कोणाला पटो न पटो, आहे हे आज मान्यच करावे लागेल. मुळातच आज ज्या धर्मनिरपेक्षतेच्या तत्वाची खरी आवश्यकता आहे, त्या तत्वांबाबत राजीव गांधींच्या काळात झालेली धरसोड असेल किंवा नरसिंहराव पंतप्रधान असताना घेतली गेलेली लेचीपेची भूमिका असेल, त्याचा मोठा फटका या पक्षाला बसला. यामुळे देशाचे देखिल मोठे नुकसान झाले, हे स्पष्टपणे सांगावेच लागेल. आजपर्यंतच्या प्रवासात काँग्रेसने अनेक राजकीय चढउतार पहिले आहेत. त्यात्या वेळच्या नेत्यांनी, त्या त्या वेळी घेतलेल्या भूमिकांमुळे काँग्रेस जशी दीर्घकाळ सत्तेत राहिली तसेच काँग्रेसला नामोहरम देखिल व्हावे लागले होते. त्यामुळे पराभव आणि पराभवातून पुन्हा उभे राहणे काँग्रेससाठी नवीन नाही.

 

     आज त्याच काँग्रेस पक्षाची मोठी रॅली नागपूरमध्ये होत आहे. नागपूर म्हटले की आज केंद्रस्थानी असलेला संघ आठवणे साहजिकच आहे. संघप्रणीत राजकीय शक्तींचे आजचे आव्हान फार मोठे आहे. मुळातच भाजपने या देशात धर्माधिष्ठित राजकारणाला कायम खतपाणी घातले, किंबहुना धर्माची शिडी करून सत्तेचे सोपान चढण्यात या पक्षाचा हात कोणी धरू शकणार नाही. आणि हे करताना देशाचा धर्मनिरपेक्षतेचा, धार्मिक सौहार्दाचा धागा म्हणा किंवा वीण म्हणा, उसवतेय याचे भान भाजपला कधीच नव्हते . आता त्याचा फटका देशाला बसलेला आहे. आणि म्हणूनच हे आव्हान पेलायचे कोणी हा आज देशासमोरचा प्रश्न आहे.
   

 

 

 कितीही पराभव झाले असले तरी आजही काँग्रेसची, राहुल गांधींची भीती स्वतःला सर्वशक्तिमान म्हणवणाऱ्या मोदी शहा जोडीला आणि त्यांच्या भाजपला आहेच. कारण काँग्रेसमुक्त भारताच्या कितीही घोषणा केल्या तरी हे शक्य नाही याची पुरेपूर जाणीव भाजपला आहे. त्यामुळेच जिथे जमेल तिथे आणि जमेल तसे काँग्रेसला अडचणीत आणण्याचे काम भाजपकडून होत असते, असे असले तरी आजही देशात सर्वदूर अस्तित्व असलेला पक्ष म्हणून काँग्रेसकडे पाहता येते. अशावेळी आज काँग्रेस भाजपचे आव्हान पेलण्यासाठी किती तयार आहे हे काँग्रेसच्या नेत्यांनी देशाला सांगायला हवे. काँग्रेसचे मधल्या काळातील विस्कटलेले संघटन, दीर्घकाळ सत्तेत असल्याने महत्वाच्या खुर्चीवर बसलेले रस्त्यावरची आंदोलने विसरलेले नेते , अजूनही सामान्यांमध्ये या नेत्यांबद्दल असलेली असूया, अंतर्गत गटबाजी आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या 'जहागिऱ्या' वाचविण्यासाठी कधीही केंद्रीय सत्तेसोबत सोयरीक करायला तयार असणारा नेत्यांचा वर्ग, या सर्वांमध्ये दुर्लक्षित झालेला सामान्य कार्यकर्ता या सर्वांना उभारी द्यायची कशी? याची रणनीती आजच्या स्थापनदिनाच्या निमित्ताने काँग्रेस पक्षाने सांगायला हवी. कारण लोकशाहीमध्ये एकाच पक्षाची शिरजोरी घातक असते, सर्वोच्च न्यायालयातून नुकतेच निवृत्त झालेल्या न्या. संजय किशन कौल यांनीही हेच सांगितले, सत्ताधारी पक्षाला अंगावर घेऊ शकणारा पर्यायी पक्ष म्हणून काँग्रेस तयार आहे का?

Advertisement

Advertisement